Bharat-भारत :विश्वरूपी देव्हाऱ्यातील अखंड आनंददीप! #1 – Best

भारत

भारत 

विश्वरूपी देव्हाऱ्यातील अखंड आनंददीप!

एकविसाव्या शतकातील 19 वर्षे उलटत असताना उभरता भारत आपल्या मनाला एक अपरिमित आनंद देऊन जातो.आव्हाने असतात, संकटे असतात.परंतु ;शिक्षण ,उद्योग, बांधकाम, समाजसेवा, समाजकारण, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात भारत आपली संपूर्ण विश्वावर उमटवत आहे.परंतु भारतीय संस्कृतीचा विचार करता ‘उभरता भारत’ हा खऱ्या अर्थाने आनंदमय आहे.

भौतिक प्रगतीला आपण कधीच अवास्तव महत्त्व दिले नाही.नको इतकी प्रगती म्हणजे सूज या तत्त्वावर आपला अजूनही विश्वास आहे .गरजेपुरते कमावणे आणि गरजेपुरता वापर हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगती करीत आहोत, हे खरे! परंतु या प्रगतीमागे भारतीय संस्कृतीचा नंदादीप अखंड तेवत आहे.

संपूर्ण विश्वाला जर पवित्र देव्हारा मानले तर त्यातील भारत हा प्रेम, माणुसकी यांचा प्रकाश सर्वत्र पसरवणारा आनंददीप आहे सेवा हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि प्रेम हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे ;असे म्हणणाऱ्या महान समाजसेवक आणि संपूर्ण विश्वाला पूज्य असणाऱ्या बाबा आमटे यांचा हा देश आहे.इथे मतभेद आहेत. इथे राजकारण आहे. इथे इर्षा आहे. इथे स्पर्धा आहे.
परंतु अखेर भारताचा अध्यात्मिक, सांस्कृतिक आत्मा हा अमर आहे.तो संपूर्ण विश्वाला अजूनही दिशा दाखवत आहे. बायबल, गीता, कुराण, ज्ञानेश्वरी हे सर्व ग्रंथ केवळ धर्माची प्रतीके नसून संपूर्ण विश्वाला दिशा देणारी विचार रत्ने आहेत……!इथला इतिहास , इथली संस्कृती ,इथली तत्वे संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत.

म्हणूनच उभरता भारत हा भौतिक दृष्ट्या प्रगत आहे ,परंतु तो संपूर्ण विश्वाला माणुसकीचे दर्शन घडवणारा सूर्य आहे.अनेक क्षेत्रांमध्ये आजही आपुलकी मानवता, ऐक्य, अखंडता या भारतीय मूल्यांना केंद्रस्थानी ठेवूनच प्रगतीचा विचार केला जातो. म्हणूनच शहीद दिन, बालिका दिन, महिला दिन,,शिक्षक दिन,,राष्ट्रीय शिक्षण दिन,साक्षरता दिन येथे आनंदाने साजरे केले जातात.

विवेकानंद म्हणतात, या जगात तीन शब्द महत्त्वाचे आहेत ते म्हणजे ;प्रेम प्रेम आणि प्रेम …..!! संत ज्ञानेश्वर म्हणतात, ” हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला….!” तर,शृंखला पायी असू दे, गीत गतीचे गात जाई! दुःखे उगळावयास आता, अश्रूंनाही वेळ नाही! पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीच्या मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू….!”अशा शब्दात महान समाजसेवक बाबा आमटे यांनी दुःखांमध्ये ही सौंदर्य व्यक्त केले आहे.

स्वतःचा आनंद शोधताना इतरांच्या दुःखाचा विचार केला तर आनंदाचे सौंदर्य झळाळून उठते.दुसऱ्याचे अश्रू समजले नाहीत, दुसऱ्याच्या वेदना समजल्या नाहीत तर स्वतःचा आनंद हा वांझोटा राहतो.तो एककल्ली राहतो आणि आपले आपणच नाचत राहतो ,त्यानंतर त्या नृत्यात इतरांचा आनंद सहभागी नाही झाल्यास आपले अंगण खऱ्या अर्थाने रिकामी राहते.

कवी नारायण सुर्वे, म्हणतात वेदनेचा ही वेद गाता आला पाहिजे .खूप शिक्षण घेतले आणि रस्त्यावरील एखाद्या गरीब भिकारी मातेचे दुःख अथवा मजुराचे दुःख समजले नाही तर आपल्या संवेदनां वर लागलेला तो मोठा आहे. दुःख आपल्या रूदयात सामील करून त्याच्यावर जर उपाय शोधत राहिलो, आपल्या आनंदाला एक वेगळाच साज चढतो.

स्वतःचा आनंद, स्वतःचे हास्य कधी आत्मकेंद्री ,स्वार्थी नसावे. उभरता भारत अजूनही याच विचारांचा आहे आणि याच विचारांवर,याच विचारांच्या भक्कम पायावर वाटचाल करीत आहे .शिक्षणाचा अर्थ संवेदनशील नागरिक बनवण्यात लपलेला आहे .तशा अर्थाने पहिले तर महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत की मदर तेरेसा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर शहीद भगतसिंग…या सर्वांनीच इतरांच्या दुःखांना आपले मानले.

ही एकात्मिक दृष्टी घेऊनच उभरता भारत वाटचाल करीत आहे .मतभिन्नता असू शकेल, मार्ग वेगळे असू शकतील परंतु; अखंड भारत ,स्वतंत्र भारत आणि माणुसकीमय भारत हेच प्रत्येकाचे स्वप्न आहे, हे वारंवार अधोरेखित झाले आहे .ज्या वाटेत काटे पसरले आहेत तीच वाट निवडली कारण त्या वाटेवर चालून इतरांच्या जीवनात फुले फुलवता येतील हे भारतीयांचे मूलभूत तत्त्व आहे.

हे जीवनाचे गुपित झपाट्याने प्रगती करणार्‍या भारताने अजूनही हृदयात जपले आहे.’तुम बेसहरा हो तो,किसी का सहारा बनो,’अशोक कुमार यांचे गीत खूप गाजले होते .खरेतर ह्या गाण्याच्या बोला मध्ये विरोधाभास आहे,असे वरकरणी वाटते.मी जर बेसहारा आहे, मला जर आधार नाही तर इतरांचा आधार कसा बनणार असे वाटू शकते परंतु हीच तर या वाक्यातील यशाचे, जीवनाचे आनंदाचे गुपित आहे.

अण्णा हजारे,सिंधुताई सपकाळ, मेधा पाटकर ,डॉक्टर रवींद्र कोल्हे अशा अनेक समाजसेवकांनी इतरांच्या अश्रूंचा जणू स्वतःच्या आनंदासाठी आधारच घेतला, असे म्हणू या …या सर्वांना स्वतःचे स्वतः सुखी राहता आले असते.परंतु त्यांनी इतरांचे दुःख दूर करण्याचा जणू विडाच उचलला. भारत हा असा आहे.

जो पद्मश्री ,पद्मभूषण, पद्मविभूषण ,भारतरत्न पुरस्कार यांचा सन्मान करता आहे .नव्या पिढीला मॅगसेसे अवॉर्ड मिळवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचे आकर्षण आहे .तसेच पद्मश्री मिळवलेल्या ज्येष्ठ लेखिका समाजसेविका सुधा मूर्ती यांच्याबद्दल ही अपार श्रद्धा आहे.खूप मोठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून विज्ञानाला आणि विज्ञानाच्या प्रसाराला स्वतःला वाहून घेतलेले आणि लहान मुलांसाठी वैज्ञानिक खेळणी तयार करणारे अरविंद गुप्ता येथे सर्वांनाच प्रिय आहेत.

उभरता भारत हा केवळ पैशाच्या मागे लागलेला देश नसून मानवी मूल्यांना सलाम करणारा देश आहे, हे समजून घेतले पाहिजे.म्हणूनच दोन ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्मदिन संपूर्ण जगात “जागतिक अहिंसा दिन” म्हणून साजरा करण्याचे युनोने ठरवले.परदेशात जाऊन मदत मिळवणाऱ्या महान स्त्री समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; ज्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन ची भेट घेतली अशा महर्षी कर्वे यांचा हा देश आहे.

समाजसुधारणेच्या, समस्या निवारणाच्या आनंदात यांचे जीवन कृतार्थ झाले.म्हणून स्वतः बेसहारा असेल आणि इतरांना सहारा दिला तर त्यातला आनंद अवर्णनीय असतो.म्हणून तर जुनी जाणती लोक म्हणायचे, घासातला घास दुसऱ्याला द्यावा .स्वतः अपूर्णत्व पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर दुसर्‍याचे दुःख, दुसर्‍याच्या भावना, दुसऱ्याच्या अश्रू यांचा अर्थ, किंमत आपल्याला कळली तर खरी एकात्मता निर्माण होते.जगात वावरताना केवळ स्वतःचा विचार केला तर कदाचित यश मिळेल ही ,कदाचित संपत्ती मिळेल ही, परंतु ती साजरी करताना आपण एकटेच असतो.

दुसर्‍याचे दुःख जेव्हा आपण वाटून घेतो आणि त्या वाटेवर चालताना जेव्हा आपण आनंदी होतो तेव्हा तो आनंद सर्वव्यापी असतो.हे विश्वची माझे घर ,ऐसी मति जयाची थोर किंबहुना चराचर आपण झाला….असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात.म्हणून विश्वाला घर मानले की परकेपणा संपून अद्वैताचा उदय होतो. भेदभाव संपून जातो.म्हणूनच संत नामदेव म्हणतात,एक तरी ओवी अनुभवावी..!! संपूर्ण पसायदान पाठ असून, तुकोबांचे अभंग पाठ आणि कुसुमाग्रज नारायण सुर्वे यांच्या कविता तोंडपाठ असून त्यातील एकही वाक्य जगता आले नाही तर ते सर्व व्यर्थ आहे..!!

अनेकांना असे वाटते की दुसऱ्यासाठी झटत राहून संघर्ष करून काय उपयोग स्वतःकडे दुर्लक्ष होते…परंतु इतरांचा विचार केला की आपल्या विचाराला प्रगल्भता येते.आपोआपच आपल्या समस्यांवर उत्तरे सापडत जातात.कारण इतरांचा आशीर्वाद ,दुवा आपल्याला मिळत जातो आणि आनंदाने जगण्यासाठी इतरांचे दुःख समजून घेत राहिले पाहिजे.प्रत्येकाचे दुःख समस्या आपल्याला दूर करता येणार नाही हे तर सरळच आहे….परंतु केवळ आपली स्नेहार्द्र नजर टाकली तरी त्या माणसाच्या चेहर्‍यावर एक विश्वासार्हता निर्माण होते आणि हा विश्वास आपल्याला आपल्या दुःखाच्या समस्या निराकरणकडे अलगद घेऊन जातो.

संत गाडगेबाबा,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तसेच काश्मीर तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश बिहार आदी राज्यातील समाजसुधारकांनी समाजसेवकांनी हीच बाब ओळखली आणि सुखाच्या सागरात डुंबत राहिले.हीच विश्वव्यापक भावना यांना अजरामर करून गेली….. आपण लवकरच अत्यंत आनंदाने समाधानाने ज्यांची 150 वी जयंती साजरी करणार आहोत ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामीण भागावर प्रचंड प्रेम केले.त्यांनी खेड्याकडे चला, असा महत्वपूर्ण संदेश दिला.

ग्रामीण जीवन, ग्रामीण लोक, ग्रामीण संस्कृती आणि एकंदरीतच गावगाडा यातील गोडी अवीट असते.शासन असो सामाजिक जीवन असो सामाजिक संस्था असोत किंवा समाजासाठी झटणारे शांतपणे कार्य करणारे समाजसेवक असोत हे सर्वच घटक एकंदरीत समाजव्यवस्थेला मानवी चेहरा कसा देता येईल याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. उभरता भारत, ग्रामीण भारताला वेगळ्या उंचीवर नेणारा आहे. प्रगती साध्य करीत असताना मूलभूत मानवी मूल्य संभाळणारा ग्रामीण भाग शहरी भागाशी आता एकरूप होत आहे.

ग्रामीण भारताला प्रगती करावयाची आहे, परंतु तो मूळ मातीची नाळ तोडायला तयार नाही.हेसुद्धा उभरता भारत विचार करताना लक्षात घेतले पाहिजे .हा मानवी चेहरा प्रदान करीत असताना समाजातील सर्वच घटक मग ते किशोरवयीन मुले-मुली असोत, बालक असोत, प्रौढ व्यक्ती असोत की ज्यांच्या आशीर्वादाची आपल्याला नितांत गरज असते अशा वृद्ध व्यक्ती असोत अशा सर्वच घटकांचा सांगोपांग विचार करूनच समाज एकजिनसी बनत असतो.

या सर्व विचार मंथन मध्ये ग्रामीण भाग हा आनंदाचा गाभा असतो.सुखाची पर्वणी असते.मनाची शांतता जिथे नांदते आणि निर्मळ आपलेपणाचा झरा जिथे वाहतो तो ग्रामीण भाग हा नव्या भारताचा सुद्धा आत्माच असला पाहिजे.ग्रामीण भागातील माझ्या बंधू-भगिनींना, बालक मित्रांना आणि सर्वच ज्येष्ठांना बरोबर घेऊन ग्रामीण भागातील माती अद्भुत सुगंध घेऊन येते.स्नेह घेऊन येते.पावसाचा पहिला थेंब मातीला अत्यंत मूलभूत, अर्थगर्भ आणि जीवनाच्या जीवनाच्या गाभ्याशी स्थिर राहणारा अर्थ प्रदान करतो.मन मोहरून जाते.

आपली माणसं हृदयात घट्ट रुतून बसलेली असतात.या माणसांच्या भल्याचा विचार करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते.विशेषतः सुशिक्षित घटक यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.ग्रामीण भागासाठी काम करणे, हा अपरिमित आनंद आहे.कुणासाठी काही करू शकलो तर त्यासारखे दुसरे अपार समाधान नाही .शेती असो शिक्षण असो समाज कल्याण असो ग्रामपंचायत विभागासह अंगणवाड्यांचा बालविकास विभाग असो की बांधकाम विभाग असो या सर्वच विभागांचा खरा आत्मा हा ग्रामीण आहे.

शहरी बंधूही आपलेच आहेत आणि त्यांची ही खरी नाळ मातीशी म्हणजेच ग्रामीण भागाशी जोडलेली असते.हा देखील मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. हीच कृतज्ञता आपल्याला बळ देते, ऊर्जा देते.हे बळ आणि ऊर्जा आणखी काम करण्याची शक्ती प्रदान करते.संत ज्ञानेश्वर,स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्यापासून ते आत्ताच्या काळातील सेवक डॉक्टर राणी बंग, डॉक्टर अभय बंग सन्माननीय अण्णा हजारे असे सर्वच समाजसेवक जीव तोडून काम करतात.त्यांच्या कामाचा आत्मा हा ग्रामीण आहे .

अजरामर साहित्य ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब दाखवते.महाराष्ट्रातील ग्रामीण लेखक शंकर पाटील असोत ,द मा मिरासदार असोत, रा रं बोराडे असोत, आनंद यादव असोत की काश्मीर ,आसाम, केरळ,तामिळनाडू,अरुणाचल प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यातील लेखक, कवी ,कवयित्री असोत ;सर्वांनीच ग्रामीण जीवनाची अद्भुत किमया आपल्या शब्दातून व्यक्त केली.एकूणच ग्रामीण जीवन, तेथील माती, तेथील माणसे यांचा गोडवा म्हणजे फणसाच्या गऱ्यासारखाच असतो.भौतिक सुखाची चिंता तेथे फारशी जाणवत नाही.

प्रगतीचे फुगलेले मनोरे तेथे साद घालत नाहीत. भरता भारत घडत असताना बंधुभाव अखंड आहे म्हणूनच भारत हा विश्वरूपी देव्हाऱ्यातील अखंड आनंददीप आहे.लग्न असो, जत्रा असो की बारसे असो सर्वच बाबतीत ग्रामीण जनता एकत्र येते.भजनाचा सूर असो की कीर्तनाची आळवणी असो, सर्व वातावरण भक्तीरसात न्हावून जाते. ग्रामीण जीवन हा म्हणूनच आनंदाचा झरा आहे. तो जपून ठेवला पाहिजे.तो भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे…!

उभरता भारत हा चारी बाजूंनी सिमेंटच्या जंगलांनी वेढलेला नाही .तो अखिल मानव जातीला इतकेच नव्हे; तर अखिल प्राणिमात्राला पुढे घेऊन जाणारी एक शक्ती आहे ,ऊर्जा आहे .अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा तो एकात्मिक आनंददायी वारसा आहे.इथल्या विविधतेत एकता आहे.उभरता भारत हा केवळ नटवा नाही. तर तो एकात्मता आणि अखंडता यांचे अवघ्या विश्वाला वंदनीय असलेले प्रतीक आहे.

  • यशेंद्र क्षीरसागर

    कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Home BlogSearch Google

Leave a Reply

Close Menu