Indian Education – #369 -The Best Education – मूलभूत शिक्षण घडवेल, परिपूर्ण संस्कारी भारत

 

indian education

मूलभूत शिक्षण घडवेल,  परिपूर्ण संस्कारी भारत..!

Indian Education

राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच; आचार्य विनोबा भावे यांना केवळ सुशिक्षित नव्हे ;तर सुसंस्कृत आणि कार्यप्रवण भारत अपेक्षित होता .एक तरुण जेव्हा आचार्य विनोबा भावे यांना भेटण्यासाठी गेला तेव्हा आचार्यांनी त्याला विचारले ,तू जीवनात काय करू शकतोस ?कोणत्या कला तुझ्याकडे आहेत ?तुला जेवण बनवता येते का ? या प्रश्नावर त्याने नकार दिला.पुन्हा विनोबांनी विचारले, तू सेवाकार्य करतोस का ?त्या तरुणाने पुन्हा नकार दिला ,त्यावर पुन्हा विनोबाजींनी विचारले, तू स्वच्छतेचे कार्य, समाजकार्य करतोस का? त्यावर सुद्धा त्यांनी नकार दिला.

अखेर विनोबाजींनी विचारले, “मग तू नेमके काय शिक्षण घेतले “तर तो म्हणाला ,”मी भरपूर अभ्यास केला ,टिपणे काढली ,पुस्तके वाचली आणि डिग्री मिळवली.”त्यावर विनोबाजी म्हणाले ,मग तू शिक्षण मिळवलेच नाहीस.तू एका अर्थाने अशिक्षितच आहेस.त्यावर तो तरुण खजील झाला आणि त्याला घेतलेल्या तथाकथित शिक्षणामधला कमजोरपणा जाणवला .आज आपण जेव्हा उभरता भारत असा विचार करतो ,तेव्हा त्याच्या तळाशी शिक्षण आणि प्रबोधन असलेच पाहिजे.

केवळ शिक्षण असून उपयोग नाही .तर ते प्रबोधनात्मक आणि संस्कारी शिक्षण हवे.पदव्यांचे शिक्षण नको.घरात आलेल्या पाहुण्यांना जर तांब्याभर पाणी देण्यास पदवीधर तरुणाला लाज वाटत असेल, किंवा स्वतःचे घर स्वतः झाडून काढण्यास लाज वाटत असेल तर ती पदवी शुन्य किंमतीची आहे.भौतिक सुखातील धोका वेळीच भारताने ओळखायला हवा आणि तो ओळखत आहे .कारण आता अध्यात्म, समाजसेवा या गोष्टींना महत्त्व प्राप्त होत आहे.

केवळ भौतिक सुखामुळे माणूस आतून कमजोर होत जातो.महान धर्मगुरू दलाई लामा यांनी म्हटल्याप्रमाणे, “रस्ते रुंद झाले ,इमारती उंच झाल्या परंतु ;माणसे मात्र खुजी राहिली”, अशा पद्धतीची प्रगती काहीच उपयोगी नाही.आता पश्चात्य देशांनाही त्यामधील चूक जाणवू लागली आहे.आज भारतात हजारो इंजिनियर्स तयार होत आहेत .हजारो विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण पूर्ण करीत आहेत.शेकडो विद्यार्थी आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण करीत आहेत.

.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात लाखो विद्यार्थी काम करीत आहेत, जॉब करीत आहेत.मात्र असंख्य भारतीय विद्यार्थ्यांना किंवा काम करणाऱ्या व्यक्तींना या क्षेत्रातून खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर सेवा आणि माणसातला चांगुलपणा यावर विश्वास ठेवला पाहिजे.कारण केवळ भौतिक प्रगतीमुळे आणि तांत्रिक वैज्ञानिक प्रगतीमुळे, भौतिक सुख नक्की मिळते परंतु ;क्षणिक असते.

मेंदूला शिणवटा येतो.मानवी जीवनाचा जो गाभा आहे तो, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो ,असा आहे.ही विश्वरूपी कामना संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केली .त्यामागील अर्थच असा आहे की; केवळ वस्तू रुपी प्रगती उपयोगाची नाही .तर इतरांचे भले व्हावे ,असा सेवाभाव मनात रुजला पाहिजे आणि त्यासाठी त्याग करण्याची तयारी पाहिजे.अनेक भारतीय मूल्यांना संपूर्ण जगाने मान्यता दिली आहे.

सत्य आणि अहिंसा या तत्त्वांना आयुष्यभर जपणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे केवळ भारतातच नव्हे ;तर संपूर्ण जगाचे वंदनीय व्यक्तिमत्व ठरले.म्हणून तर दोन ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन संपूर्ण जगात जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.आज भारतातील 29 राज्य आणि नऊ केंद्रशासित प्रदेशात रस्ते, दळणवळण, दूरसंचार, समाजमाध्यम, शिक्षण (Indian Education), बांधकाम अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती होत आहे. मात्र आनंदाची बाब अशी आहे की भारतीय समाजात एक अदृश्‍य प्रवाह असा वाहत आहे जो भौतिक सुखाला नगण्य लेखत नाही परंतु ;त्यापेक्षाही श्रेष्ठ काहीतरी आहे, यावर विश्वास ठेवून आहे.

म्हणून तर समाजसेवा, अध्यात्म यामध्ये सुद्धा भारतीय समाजात एकविसाव्या शतकाची 19 वर्षे उलटून गेली तरी मोठा तरुण वर्ग कार्यरत आहे .मनशांतीचे महत्त्व नव्याने अधोरेखित होत आहे.खरा आनंद कशात आहे याचे ही विचारमंथन खूप मोठ्या स्तरावर होत आहे .अर्थात शिक्षण (Indian Education), प्रबोधन, अध्यात्म ,मनःशांती या बाबी प्रगतीच्या आलेखात दिसून येत नाहीत .त्या आकड्यात फारशा मोजता येत नाहीत.परंतु त्या भारतीय समाजात अदृश्यपणे गंगेप्रमाणे, शुद्धपणे, शांतपणे आणि तितक्याच निरपेक्षपणे वाहत आहेत ..!

नवी पिढी जागृत आहे.चौकस आहे .चौफेर विचार करणारी आहे .आता आंधळेपणाने अनुकरण करणे या पिढीला आवडत नाही .समाजमाध्यमांचा मुक्तपणे वापर करणारी ही पिढी आहे .म्हणूनच ;या पिढीला जितका पिझ्झा-बर्गर आवडतो ,तितकीच बैलगाडीतून सफर करायला आवडते .मोबाईल, कम्प्युटर्स, लॅपटॉप अशी आधुनिक साधने ग्रामीण भागात झपाट्याने पोहोचत आहेत.त्यामुळे ग्रामीण तरुण-तरुणींमध्ये सुद्धा एक अद्भुत लालसा निर्माण होत आहे.

हे खरे असले तरी मूलभूत मानवी मूल्यांना उजळवणारे शिक्षण (Indian Education) देण्यासाठी नव्या भारतात विशेष प्रयत्न केले जात आहेत .हे संपूर्ण जगाला ही ठाऊक आहे.संस्कार नसतील तर प्रगतीला अर्थ नाही .हे आता सर्व पातळ्यांवर सर्व वयोगटांत समजू लागले आहे.एखादा महाराष्ट्रीयन तरुण सुद्धा काश्मीरमध्ये जातो आणि तेथील दीडशेहून अधिक बेसहारा विद्यार्थ्यांना आधार देतो ,एखादा गुजरातमधील तरुण सुद्धा योग साधन मार्गाने जाऊन हजारो जणांना प्रशिक्षित करतो.
एखादा तामिळनाडूतील तरुण, केरळमधील तरुण सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केवळ सेवा करण्यासाठी यूपीएससी परीक्षा देऊन मोठा प्रशासकीय अधिकारी होतो…….अशी शेकडो उदाहरणे नव्या भारतात आहेत .या उदाहरणांवरून स्पष्टपणे समजते की भारत भौतिक प्रगती करतोय .परंतु; शिक्षण (Indian Education), प्रबोधन, मूलभूत मूल्य आणि संस्कार याबाबत हा भारत सजग आणि चौकस आहे.

अर्थात हा अर्थपूर्ण भारत घडवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज मात्र अजूनही आहे .अनेक ठिकाणी नव्या यंत्रसामग्रीच्या कार्यप्रणालीमध्ये मुला-मुलींना, तरुण-तरुणींना उज्ज्वल इतिहासाचा खरा आनंद देणाऱ्या संस्कृतिक ,सेवायुक्त व्यवस्थेचा विसर पडलेला जाणवतो.

नंतर त्यांच्या ते लक्षात येते .परंतु तो उशीर करू शकतो .म्हणूनच बाल्यावस्थेपासून संस्कार शिक्षण (Indian Education) ,मूलभूत शिक्षण दिले तर नवा भारत उभरता भारत अर्थपूर्ण वाटचाल करीत राहील .नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा मुलगा डॉक्टर राम कोल्हे हा सुद्धा एमबीबीएस करून मेळघाटातील गरीब आदिवासींची मोफत सेवा आयुष्यभर करणार आहे.

जगप्रसिद्ध असलेले महान समाजसेवक आमटे कुटुंब सेवेत वाहून घेते .या कुटुंबातील नवीन तरुण पिढी सुद्धा याच कार्यात काम करण्यात धन्यता मानत आहे.एखादा लोकसेवा परिवार; एखादा मित्र समूह आपल्या भागातील गरिबांची ,वंचितांची, पीडितांची सेवा करण्यासाठी झटतो.तरुण स्वयंसेवक प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य, एकांकिका बसवतात.

ग्रामीण भागात वनवन करतात.त्या बदल्यात किती मोबदला मिळतो याचा विचारही करत नाहीत…तरीही हे समाजसेवक, समाजसुधारक भौतिक सुख कमी लेखत नाहीत .तांत्रिक भारताचा ते दुस्वास करत नाहीत .त्यामुळे जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो; तेव्हा केवळ डॉक्टर, इंजिनियर ,कृषीतज्ञ, सरकारी अधिकारी असा विचार न करता सेवा कार्याकडे ही करिअर म्हणून पाहणारी मोठी पिढी भारतात आहे ,हे स्पष्टपणे जाणवते.राजकारणात सुद्धा सेवा या अंगाने प्रवेश करणारे खूप तरुण आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी “नई तालीम” ही कल्पना मांडली होती.त्यातून खऱ्या अर्थाने नागरिक घडवण्यासाठी बौद्धिक बरोबर शारीरिक श्रमावर भर दिला होता.

स्वामी विवेकानंद म्हणतात, “शिक्षण म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात पूर्वीपासूनच विराजमान असलेले पूर्णत्व प्रकट करणे होय”.या दोन महान व्यक्तींच्या विचारातून लक्षात येते की मूल्यशिक्षण अर्थात मूलभूत शिक्षण हे बालपणापासून अखेरपर्यंत चालूच राहिले पाहिजे.केवळ विद्यार्थीदशेतच विचार केला तरी यावर मात्र विचार झाला पाहिजे की मूल्यशिक्षण किंवा मूलभूत शिक्षण (Indian Education) हे केवळ प्राथमिक स्तरावरच का द्यावे? हे शिक्षण माध्यमिक, महाविद्यालयीन आणि त्यानंतरही तरुणांना दिले तर अधिक संस्कारी “e-bharat “घडेल! उदाहरणच द्यायचे झाले तर अत्यंत लहान वयातील बालकांना पसायदान शिकवले जाते.

बाराशे 75 मध्ये जन्मलेल्या संत ज्ञानेश्वरांनी बाराशे नव्वद मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली; जिच्यामध्ये संपूर्ण विश्वाच्या कल्याणचा मनोदय व्यक्त केला आहे.हा मनोदय निस्वार्थी आणि भारतीय मूल्यांना अधोरेखित करणारा होता .इतकी उच्च संकल्पना जी भारतीय संस्कृतीला खऱ्या अर्थाने शिक्षण प्रबोधनकडे घेऊन जाते ही संकल्पना केवळ बालवयातच का समोर यावी?

वय वर्षे 15 नंतर पंचवीस ते तीस वयापर्यंत पसायदान, राष्ट्रगीत ,वंदे मातरम, संतांचे अभंग त्यांची शिकवण ,समाजसुधारकांचे जीवन ,त्यांचे कार्य यांचा संघर्ष याविषयी शिक्षण आवर्जून दिले पाहिजे .जेव्हा समजण्याच्या वयात पसायदान सांगितले जात नाही ,तेव्हा बालवयातल्या पसायदानाचा काहीच उपयोग संस्कारी मनावर होत नाही.

त्यामुळे मूलभूत शिक्षणाचा विचार करत असताना आणि नवभारतातील संस्कारी भारताचा विचार करत असताना हे ध्यानात घेतले पाहिजे की “परिपाठ “हा सर्वच विद्यार्थ्यांना आणि शक्य तितक्या समाजातील घटकांना समूहांना शिकवला गेला पाहिजे .अनेक वेळेला तरुण-तरुणींना संपूर्ण राष्ट्रगीत, वंदे मातरम म्हणता सुद्धा येत नाही.त्याचा अर्थ सुद्धा सांगता येत नाही.पसायदान मी शाळेत शिकलो होतो.

आता माझ्या लक्षात नाही ,असे जेव्हा महाराष्ट्रीयन तरुण किंवा तरुणी म्हणते तेव्हा प्रचंड खेद वाटतो आणि वाईट वाटते….म्हणूनच मूलभूत शिक्षण देत असताना मूल्यशिक्षण देत असताना आणि भौतिक सुखाबरोबरच खरा आनंद कसा मिळवता येईल याचा विचार करीत असताना विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन काळापर्यंत परिपाठ तसेच इतर मूल्य शिक्षण दिले गेले पाहिजे.

मेडिकल, इंजीनियरिंग असो की एखादा कला शाखेतील पदवीचा अभ्यासक्रम असो सगळीकडेच संत, समाजसुधारक ,देशभक्ती, सर्वधर्मसमभाव आदी मूल्यांचा परिपोष करणारे शिक्षण दिले गेले पाहिजे .अशा शिक्षणाचा त्यांच्याच व्यक्तिमत्त्वाला फायदा आहे आणि त्यामुळे एकंदरीत भारताचे व्यक्तिमत्व उजळून निघेल हा विश्वास त्यांच्या मनात पेरला पाहिजे …!!!

भारतीय शिक्षणप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी तरुण-तरुणींचे गट सुद्धा भारतात येतात.शिक्षण (Indian Education) प्रणालीचा अभ्यास करतात येथील प्रेम ,आपुलकी, माणुसकी, सर्वधर्मसमभाव, नीरक्षीरविवेकबुद्धि या मूल्यांनी प्रभावित होतात.त्यावेळी आपल्यावर आपण जबाबदारी येते की ही मुले जागतिक होत असताना आपण त्यांचे संवर्धन ,जतन केले पाहिजे.

उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब वगैरे राज्य किंवा दक्षिणेकडील तामिळनाडू ,केरळ राज्य अथवा मध्यभारतातील मध्यप्रदेश, महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच होत असतात.त्यामधून जर बारकाईने विचार केला तर लक्षात येते की मूलभूत आणि मूल्य शिक्षण तसेच; प्रबोधन हाच एकविसाव्या शतकात सुद्धा भारतातील अनेक हालचालींचा गाभा आहे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण या दोन्ही पातळ्यांवर मूल्य शिक्षणावर ,मूलभूत शिक्षणावर; संस्कृतिक प्रणालींच्या अध्यापनावर अधिक भर अजूनही दिला पाहिजे.

आजही अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आणि विविध पातळ्यांवरील सकारात्मक हालचाली या मूलभूत मूल्यशिक्षण याकडेच वळलेल्या दिसतात.विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अंतःप्रवाह हा संस्कृती आणि मूलभूत शिक्षणामुळेच जास्त प्रकाशमान होतो.विज्ञान, तंत्रज्ञान ,कला-संस्कृती ,शिक्षण, प्रबोधन हे सर्व हातात हात घालून जातात ,तेव्हाच एकमेकांच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो.

हे भारतीय समाजाला प्रामाणिकपणे आणि सच्चेपणाने माहित आहे.आजच्या प्रगतशील समाजात किंचितसे दुर्लक्ष झालेले दिसत असल तरी पुनश्च आपण खडबडून जागे होतो.आणि भारतीय तत्वप्रणाली मूलभूत शिक्षण प्रणाली, घट्ट करण्याकडे वळतो आणि त्यामुळेच नवा संस्कारी भारत घडत आहे ,हे मात्र खरे आहे…. *”हमारी ही मुठ्ठी मे आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा !!”या तत्त्वावर आपला विश्वास आहे

  • यशेंद्र क्षीरसागर

    कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

  • Minglish Version of Article

Home BlogSearch Google

Leave a Reply

Close Menu