Indian Woman – भारतीय स्त्री, जगाची आयडॉल..! #1 – Best

 

Indian Woman

भारतीय स्त्री, जगाची आयडॉल..!

Indian Woman

जिथे स्त्रीची पूजा होते, तिचा गौरव होतो,तिचा सन्मान होतो ,तिथे देवतानाही निवास करायला आवडते.अशा अर्थाचे” यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ,रमन्ते तत्र देवता” असे संस्कृत वचन आहे.आई, बहिण ,पत्नी ,मुलगी, आत्या, काकी ,मावशी अशा असंख्य नात्यांनी स्त्री केवळ पुरुषालाच घडवते असे नाही, तर आपल्या अतूट मायेमुळे आणि प्रेमामुळे कुटुंबासह देशाला सुद्धा एक अर्थपूर्ण आकार देते…भारतभूमी तर अशा कर्तृत्ववान, प्रेमळ ,मायाळू आणि खंबीर स्त्रियांची भूमी आहे! संत मुक्ताबाई पासून मदर तेरेसा पर्यंत आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यापासून महान समाजसेविका डॉक्टर राणी बंग यांच्यापर्यंत अशा असंख्य स्त्रियांनी, भगिनींनी, मातांनी भारत घडवला आहे.

एकविसाव्या शतकाचा विचार करता सुद्धा गिर्यारोहक बचेंद्री पाल असो की अभिनेत्री विद्या बालन असो, समाजसेविका मंदाकिनी आमटे असोत की ;अभिनेत्री कंगना राणावत असो विविध क्षेत्रात स्त्रियांनी भरारी मारली आहे! हा उभरता भारत स्त्रियांच्या खंबीर खांद्यावर उभा आहे.जितका तो पुरुषांनी सावरला आहे ,तितकाच किंवा काकणभर सरस तो स्त्रियांनी सावरला आहे.या भारतभूमी मध्ये जशी नेहा कक्कर नावाची मुलगी स्वतःच्या आवाजाच्या जादूने आणि परीक्षणाच्या कलेने प्रकाशात येते, तशीच एखादी राणू मंडल सुद्धा संपूर्ण भारतातच नव्हे; तर जगात एक उदाहरण पेश करते.

फॅशन, क्वीन आणि तनु वेड्स मनु रिटर्न सारख्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली कंगना राणावत असो की आपल्या वेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेली तापसी पन्नू असो अशा अभिनेत्रींनासुद्धा विविध समस्यांना सामोरे जाण्याची ताकद आणि मनाची तयारी मोठ्या खंबीरपणे दाखवली आहे.इतकेच नव्हे ;तर एखादी झोया अख्तर “जिंदगी  ना मिलेगी दोबारा” आणि गली बॉय सारखे आशयसंपन्न वेगळ्या विषयावरच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून आपली सामाजिक अभ्यासाची चुणूक दाखवते.

तेव्हा कोणतेही क्षेत्र स्त्रियांसाठी अस्पर्श राहिलेले नाही, याची तीव्रतेने जाणीव होते. अहमदनगर जिल्हा तसेच जळगाव भागात नीलिमा मिश्रा नावाच्या भगिनीला गरीब स्त्रियांबद्दल, भगिनी बद्दल कळवळा आला .या भगिनीला काहीतरी करावेसे वाटले.मग या भगिनीने  गोधडी शिवण्याची आयडिया पुढे आणली.सर्व भगिनींना एकत्र केले.शेकडो गोधड्या तयार केल्या.आज गोधड्या अमेरिकेसारख्या देशात सुद्धा पाठवल्या जातात आणि त्यामुळे शेकडो स्त्रिया आणि त्यांचे संसार उभे राहिले आहेत.याच नीलिमा मिश्रांना आशिया खंडाचा नोबेल समजला जाणारा  मॅगसेसे पुरस्कार प्राप्त होतो..!तेव्हा डोळे भरून आल्याशिवाय राहत नाहीत.

माया, आपुलकी, प्रेम या गुणांच्या आधारे मुलगा वडील पती भाऊ या सर्वांना आधार देणारी स्त्री आपण कायमच पाहिली आहे .मग त्या जिजामाता असोत की एखादी सामान्य गृहिणी असो.तथापि उभरता भारत असा विचार करता अलीकडे स्त्रिया विशेषता तरुण मुलीसुद्धा सामाजिक भान घेऊन पुढे येत आहेत.त्यामुळेच नीलिमा मिश्रा यांचे उदाहरण ठळकपणे पुढे येते .शेकडो गोधड्या शिवायला लावून त्यांचे मार्केटिंग करून परदेशात त्या लोकप्रिय करून हजारो स्त्रियांचे संसार उभा करणाऱ्या मिश्रा यांना आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार समजल्या जाणाऱ्या  अशा या मॅग्सेसे पुरस्काराने गौरवले गेले, हे काही उगीच नव्हे…!

म्हणूनच भारतीय स्त्रियांचा जगाच्या क्षितिजावर डंका वाजत आहे .भारतीय स्त्री ही जागतिक स्तरावर आयडॉल ठरत आहे..एमबीबीएस, एमडी सारख्या उच्चतम पदव्या मिळवून श्रीमंत कोणालाही होता येईल .छानछोकी जगता येईल.वर्षातून एकदा परदेशवारी करता येईल .मोठा बंगला बांधता येईल आणि समाजात मिरवता येईल परंतु जेव्हा डॉक्टर स्मिता कोल्हे या असा निर्णय न घेता आपले पति समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे यांना मेळघाटात आदिवासींची सेवा करण्यासाठी प्राणपणाने साथ देतात तेव्हा उभरता भारत निर्माण करताना स्त्रियांचे किती लक्षणीय योगदान आहे याची साक्ष पटते.

मेळघाटातील आदिवासींची वैद्यकीय सेवा डॉक्टर स्मिता कोल्हे या मनापासून आणि प्राणपणाने करीत आहेत.केवळ महिना चारशे रुपये संसार चालवण्याचे त्यांनी मनोमन ठरवले आहे .आज आपण पिझ्झा बर्गर मागवला तर चारशे रुपये सहज जातात मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेलो अथवा एखादा शर्ट जरी घेतला तरी चार पाचशे रुपये सहज जातात.एवढ्या रुपयांमध्ये उच्चतम पदवी मिळवून सुद्धा समाजसेवा करत करत संसार चालवणाऱ्या डॉक्टर स्मिता कोल्हे यांना सलामच केला पाहिजे.आज मेळघाटामध्ये कोल्हे दांपत्याच्या प्रयत्नांमुळे चांगले रस्ते वीज आणि प्राथमिक उपचार केंद्रे निर्माण झाली आहेत .मात्र तेथे सर्जनची आवश्यकता आहे.कोल्हे दांपत्याचे हे अद्वितीय समाजसेवा कार्य पाहून 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे! 

डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्या प्रमाणे त्यांचाही गौरव झाला आहे कोल्हे दांपत्याचा सुपुत्र डॉक्टर राम कोल्हे सुद्धा एमबीबीएस करीत आहेत आणि त्यांनी सुद्धा प्राणपणाने शपथ घेतली आहे कि आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून ते गरिबांची आदिवासींची सेवा करणार आहेत.ते सर्जन होणार आहेत.म्हणजे सर्जन असल्याची समस्या मेळघाटात दूर होईल.डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा हा त्याग असीम आहे .खरतर या मातेचे योगदान आहे की ज्यामुळे त्यांचा मुलगा आज सेवा करण्यास प्रवृत्त झाला आहे.आजच्या भौतिक सुखाच्या काळात छानछोकीच्या काळात डॉक्टर स्मिता कोल्हे यांचे योगदान तसेच नीलिमा मिश्रा यांचे योगदान अद्वितीय असेच आहे . 

एकविसाव्या शतकाची 19 वर्षे आता उलटली आहेत.सिस्टर निर्मला म्हणजेच निर्मला जोशी किंवा कुसुम जोशी यांचेही उदाहरण वाखाणण्याजोगे आहे त्यांना भारतरत्न च्या खालोखाल दर्जा असलेला पद्मविभूषण सन्मान प्राप्त झाला आहे! महान समाजसेविका  मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चारिटी या संस्थेच्या त्या मुख्य अधिकारी होत्या 1997मध्ये मदर तेरेसा यांच्याकडून संस्थेचा पदभार घेतल्यावर सिस्टर निर्मला यांनी संस्थेचा प्रभाव 134 देशातून पसरला हे …!त्यांचे खूपच मोठे कार्य आहे.

भारतामध्ये सेवा आणि मानवता या मूल्यांना खूप मोठे स्थान दिले गेले आहे .मदर तेरेसा या तर जगाच्या आई होत्या .त्यांना संपूर्ण जगाच नागरिकत्व प्राप्त होते मदर तेरेसा या महानतम संत होत्या.त्यांनी भारतात प्रचंड कार्य उभे केले .सेवेचा एक डोंगर नव्हे तर पर्वत उभा करून मापदंड निर्माण केला.आदिवासींच्या सेवेबरोबरच व्यसनमुक्तीसाठी महान कार्य करणारे दांपत्य म्हणजे डॉक्टर बंग दांपत्य होय.यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.डॉक्टर राणी बंग यादेखील सर्वांपुढे आदर्श आहेत.”माझा साक्षात्कारी हृदयरोग” पुस्तक लिहिणार्‍या डॉक्टर अभय बंग यांनी आपली वाटचाल व्यक्त केली आहे .डॉक्टर राणी बंग यांचे एकविसाव्या शतकात मुलींसमोर आणि अखिल भारतातील स्त्रिया समोरच नव्हे तर सर्व समाजासमोर मोठे आदर्श उदाहरण आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासी भागात केवळ आरोग्य सेवा न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील .यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉक्टर अभय बंग यांच्या साथीने डॉक्टर राणी करत आहेत .हे त्यांचे सेवाकार्य 32 वर्षांपासून अखंडपणे चालू आहे .भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे .दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्या याबाबत त्यांनी तयार केलेला उपक्रम आज भारतासह अनेक देशात लागू करण्यात आला आहे .म्हणूनच सार्थपणे मी या लेखाचे शीर्षक दिले आहे.

भारतीय स्त्री ही जागतिक आयडॉल ठरत आहे .बंग दाम्पत्यांनी तयार केलेला उपक्रम अनेक देशात लागू करण्यात आला.ही बाब भारतासाठी भूषणावह आहेच पण त्यासोबतच अखिल स्त्रियांसाठी ती गौरवास्पद आहे .सर्च नावाच्या संस्थेतून हे दांपत्य अथक सेवा करीत आहे डॉक्टर राणी बंग यांचा जन्म चंद्रपूर येथे दक्षिण भारतीय कुटुंबात झाला या दोघांचेही एमबीबीएस आणि एमडी पर्यंतचे शिक्षण नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाले.आपल्या वैद्यकीय शिक्षणात त्यांनी विद्यापीठात आणि अखिल भारतीय स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त करीत अनेक सुवर्णपदके मिळवली.

लोकांच्या आरोग्यासाठी काम करायचे असल्याने दोघांनीही अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ चे शिक्षण पूर्ण केले तेथे कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले 1984 मध्ये ते शिक्षण आटोपून भारतात आले.इतक्या शिक्षणानंतर डॉक्टर राणी बंग यांना पतीसह आयुष्य आरामात जगता आले असते बंगला गाडी यासह एक छान  आयुष्य जगता आले असते .परंतु आरोग्याच्या सर्वाधिक समस्या या खेड्यांमध्ये आहेत याची त्यांना कल्पना होती.पण सगळे संशोधन सुरू होते ते शहरांमध्ये जिथे जास्त समस्या आहेत तिथेच नवे काम सुरू करायचे असे त्यांनी ठरवले यावरून लक्षात येते की सेवा हा स्त्रियांचा स्थायीभाव आहे.

 परंतु अशा महान स्त्रिया या सेवा त्याग या मानवी मूल्यांच्या अखंड नंदादीप आहेत.1981 च्या आसपास चंद्रपूर पासून गडचिरोली जिल्हा निर्माण झाला.हा अतिशय दुर्गम आणि दारिद्र्य आणि निरक्षरता यांनी गंजलेला जिल्हा होता त्यामुळे तिथेच कार्य  करण्याचे डॉक्टर राणी बंग आणि त्यांचे पती डॉक्टर अभय बंग यांनी ठरवले .त्यांनी सर्च नावाची संस्था स्थापन केली.ग्रामीण भागातील आरोग्य या समस्या कशा सोडवायच्या याचे संशोधन करणे हा संस्थेचा उद्देश होय आणि तेव्हापासून अखंडपणे तीस वर्षाहून अधिक काळ डॉक्टर राणी बंग पतीसह गरीब आदिवासींची सेवा करीत आहेत.

हे काम अत्यंत निस्वार्थी भावनेने सुरु आहे नीलिमा मिष्रा डॉक्टर राणी बंग असोत की सिस्टर निर्मलायांचे सेवाकार्य पुरस्काराच्याही पलिकडचे आहे म्हणूनच  उभरता भारत असा विचार करता स्त्रियांचे योगदान हे एखाद्या तळपत्या सूर्याप्रमाणे आहे.निलीमा मिश्रा यांची गोधडी सुद्धा सर्वांना मायेची ऊब देते आणि गरीबाच्या घरात चूल पेटते तर स्मिता कोल्हे यांची सेवा गरिबाला जीवदान देते डॉक्टर राणी बंग यांची सेवा आदिवासींना एक तेजोमय प्रकाश देते यासर्व भगिनींचे कार्य उभरता भारत घडवत आहे .पायल जांगिद चे उदाहरण सुद्धा खूप महत्त्वाचे आणि बोलके आहे .

पायल जांगिद या भारतीय किशोरवयीन कन्येला न्यूयॉर्कमधील गोलकीपर ग्लोबल गोल अवॉर्ड्समध्ये चेंजमेकर पुरस्कार मिळाला बालकामगार आणि बालविवाह संपविण्याच्या तिच्या मोहिमेस पुरस्काराने मान्यता दिली.बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन तर्फे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला .पायल जांगिद ही सतरा वर्षीय मुलगी आहे.तिने वयाच्या अकराव्या वर्षी स्वतःच्या बालविवाहविरुद्ध लढा दिला होता.सध्या ती बालविवाहाला कडाडून विरोध करीत आहे.बालविवाहाला विरोध करण्यासाठी आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांना उद्युक्त करण्यासाठी ती मोहीम राबवीत आहे. यावरूनच लक्षात येते की पायल हिचे कार्य किती मोठे आहे.

 भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आपल्या वयाची एकशे चार वर्ष संपूर्ण स्त्रियांच्या उद्धारासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी वेचली अहोरात्र कष्ट केले .अविरत झगडले .महर्षी कर्वे शिक्षण संस्था स्थापन केली.एका झोपडीतून त्यांनी ज्ञानाची गंगा सुरू केली .तसेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली.असंख्य वेदना आणि समाजाचा तिरस्कार सहन केला .सावित्रीबाई फुले या क्रांतीज्योती ठरल्या तर महात्मा फुले हे क्रांतीसुर्य ठरले.त्यांनी मागासवर्गीय असोत की इतर असोत, सर्वच स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी प्राणपणाने कार्य केले स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला केला.स्वतःच्या वडिलांनी महात्मा फुलेंना गृहत्याग करण्यास भाग पाडले तरी ते हिंमत हरले नाहीत.

सावित्रीबाई फुले यांच्या मुस्लीम मैत्रिण म्हणजेच फातिमा यांनी त्यांना साथ दिली ही सर्व उदाहरणे आठवण्याचे कारण म्हणजे पायल हिचे कार्यही याच कार्याला वंदन करणारे आहे.इला भट याही समाजसेविका त्याच पठडीतील आहेत.असंघटीत महिला कामगारांसाठी इला भट यांनी मोठे कार्य उभे केले आहे.या महिलांना एकत्र करून त्यांना स्वयंरोजगार देणे या उद्देशाने त्या कित्येक वर्षे कार्यरत आहेत. पायल चे उदाहरण इला भट यांचे उदाहरण यातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महर्षी धोंडो केशव कर्वे रमाबाई रानडे आनंदीबाई जोशी यांचाच वारसा पुढे चालवत आहेत हे प्रकर्षाने जाणवते.

छत्तीसगडच्या प्रसिद्ध लोककलावंत तीजनबाई यांना 2019 मध्ये पद्मविभूषण या महत्वाच्या सन्मानजनक पुरस्काराने गौरवण्यात आले.त्यांनी लोककलांना जिवंत करण्याचे महान कार्य केले आहे.संपूर्ण जगात त्यांनी आपल्या लोककलेला पोचवले आहे.बचेंद्री पालचे उदाहरण तसेच आहे.बचेंद्री पाल ही भारताची सगळ्यात ख्यातनाम गिर्यारोहक आहे.मे 1984 ला जागतिक जगातील सगळ्यात उंच शिखर एवरेस्ट त्यांनी सर केले.एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.1954 मध्ये त्यांचा जन्म उत्तराखंडमधील गडवाल भागातील नागपुरी गावात झाला.त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.त्यापैकी पद्मभूषण हा महत्त्वाचा पुरस्कार होय. 

पायल असो की इला भट असो त्यातून आत्ताच्या मुलींना स्त्रियांना खूप मोठी ऊर्जा मिळत आहे.भारत त्यामुळे अर्थपूर्ण ठरत आहे.आनंदा शंकर जयंत या भगिनीची तर कहाणीच वेगळी आहे .त्या रेल्वेतील पहिल्या महिला अधिकारी आहेत.पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या नृत्यांगना आहेत .परंतु ;याहूनही महत्त्वाचे म्हणजे कॅन्सरसारख्या आजारावर त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती ने विजय मिळवला…..!!

निराशा आणि स्वप्नांचा चुराडा, त्यातही त्यांनी हास्य फुलवलं .आयुष्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवानंतर पुन्हा ठाम उभं राहणं अगदी क्वचितच काही जणांना जमत. ते तिला जमलं.नृत्यामुळे त्यांच्या मनाला मिळणारा आनंद….शंकर आणि दुर्गा यांनी करून दिलेल्या त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आणि त्यांची शक्ती त्यांचा आयुष्यभराचा जोडीदार जयंत या साऱ्याच्या साथीने त्यांनी त्यांचा हा ध्येय मिळवण्याचा आणि प्रकाशमान होण्याचा प्रवास अतिशय सुखकर झाला…!!!त्या  ठाम उभ्या राहिल्या.

उभरता भारत जेव्हा आपण अभिमानाने पाहतो, तेव्हा अशा असंख्य दुर्गा आपल्याला ऊर्जा देत राहतात.प्रकाश देत राहतात .नवीन भारतातल्या देव्हाऱ्यातल्या ह्या अखंड तेजाळणाऱ्या ज्योती आहेत…..!!!

 

 

  • यशेंद्र क्षीरसागर

    कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Home BlogSearch Google

Leave a Reply

Close Menu