Indian Yuva -सक्षम, सशक्त, जागरूक बनतोय भारतीय युवा..! – #369 – The Best

सक्षम, सशक्त, जागरूक  बनतोय भारतीय युवा..!

(Indian Yuva)

“मला शंभर प्रामाणिक तरुण(yuva) मिळवून द्या, मी संपूर्ण भारताचे नशिब बदलून दाखविण”, अशी घोषणा संपूर्ण युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांनी केली होती.यावरूनच तरुण वर्गाचे एखाद्या देशातील स्थान आणि महत्त्व अधोरेखित होते.1863 ला जन्मलेले विवेकानंद यांनी 1902 च्या जुलैमध्ये देह अर्पण केला.त्या विवेकानंदांनी तरुणांसाठी खूप मोठे आणि चिरस्थायी विचार मांडले म्हणूनच त्यांचा हा विचार महत्त्वाचा ठरतो.

उभरता भारत जेव्हा आपण विचारात घेतो.तेव्हा भारताची तरुण  (yuva) लोकसंख्या आपण नाकारू शकत नाही .वीस ते पंचवीस वर्षे असलेल्या तरुणांची संख्या 55 टक्के पेक्षा जास्त आहे.गेल्या काही वर्षांचा किंबहुना; दोन दशकांचा विचार केला तर भारत हा केवळ तरुणांच्या जास्त संख्येमुळे नाही,विचारप्रवण, सजग आणि सक्षम तरुणांचा देश आहे.हे लगेच जाणवते.तंत्रज्ञानाधिष्टीत समाजाचे प्रतिनिधित्व करणारा आपला तरुण (yuva) हा भावनेने देशप्रेमाने आणि कर्तृत्वाने परिपूर्ण आहे.

अर्थात युवावर्ग हा चांगुलपणा आणि थोडसं अडखळणं यांचे बेमालूम मिश्रण असतो…!हे कबूल करावे लागेल .तरीही मूलभूत भारतीय संस्कृतीची बीजे ज्या हृदयात पेरली गेली आहेत ,तो भारतीय तरुण काही अपवाद करता भरकटू शकत नाही .आज तरुण (yuva) केवळ इतिहासावर डोळे झाकून विश्वास न ठेवता अगर कोणत्याही सामाजिक राजकीय अथवा इतर नेत्यांच्या मागे अविचारी विचार करून आंधळेपणाने न पळता विकासाधिष्टीत विचार करणारा व्यवहारी तरुण (yuva) आहे.कलाक्षेत्र, सेवाक्षेत्र ,विज्ञानाचे क्षेत्र ;अगदी समाजसेवेचा जरी विचार केला तरी नवीन भारतातील तरुण (yuva) हा सजग आणि सक्षम आहे हेच दिसून येते!

शासन ,प्रशासन आणि समाजव्यवस्था या तीनही टोकांचा एकत्रितपणे, साकल्याने विचार करणारा तरुण वर्ग आज समोर दिसतो तो वरकरणी व्हाट्सअप, फेसबुक वर तुम्हाला गुंतलेला दिसेल.सतत कॉम्प्यूटरच्या समोर बसलेला दिसेल.हातात मोबाईल चाळवणारा दिसेल .परंतु; तो भरकटलेला, अविचारी ,निश्चितच नाही.एकूणच विज्ञान पुढे गेले असल्यामुळे त्या प्रगतीबरोबरच तरुणाला धावणे गरजेचे आहे.परंतु एकंदरीत विचार मंथन पाहिले तरी सोशल मीडियावर जाणवते की तरुण (yuva) वर्ग हा सक्षम सजग आणि जागरूक होत आहे. 

तो आपली मते कधी संयमी पणाने तर कधी आक्रमकतेने मांडत आहे.आजची भारतीय तरुण पिढी धाडसी ,पराक्रमी तर आहेच पण त्यासोबत आक्रमक सुद्धा आहे.एखादी गोष्ट पटली नाही तर ती आक्रमकपणे मांडणे पुराव्यांसह मांडणे आणि कोणतीही भीडभाड न बाळगता मांडणी हे या पिढीचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.इसवी सन 2000 नंतर ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवायला लागली.

चित्रपट असो नाट्य असो राजकारण असो क्रीडा असो सगळीकडेच नवी भारतीय पिढी आपली छाप उमटवत आहे.क्रीडाक्षेत्रात अभिनव बिंद्रा असो विश्वनाथन आनंद असो की चित्रपटक्षेत्रात विकी कौशल राजकुमार राव असोत की उद्योगक्षेत्रात बजाज अंबानी असोत सगळीकडेच भारतीय तरुण वेगळी छाप उमटवत आहे.

अर्थात व्यसनाधीनता, बेरोजगारी, गुन्हेगारी या सार्वकालिक समस्या समांतर पातळीवर चालू आहेतच.परंतु या समस्यांचा बाऊ न करता एक ठराविक मतप्रवाह आणि कार्यप्रवाह सक्षमतेने पुढे सरकत आहे.हे स्पष्टपणे दिसते.केवळ महाराष्ट्रातील तरुण (yuva) नव्हे; तर उदाहरणादाखल जम्मू-काश्मीरमधील तरुणाचा विचार केला तर कलम 370  हटवल्यानंतर तेथील दहशतवाद पातळी खूपच खालावली आहे.

शांतता प्रस्थापित होत आहे.तेथील तरुण (yuva) मुख्य प्रवाहात येत आहे.हे एक मोठे उदाहरण म्हणता येईल .गोव्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर पर्यटन क्षेत्रात अग्रेसर आहे.केरळ, तामिळनाडू तरुण वर्ग हे आयएएस आयपीएस ला झोकून देतात .रेल्वे खात्यात  अधिकारी होण्यासाठी झोकून देतात.तर बिहार, उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी तरुण-तरुणी मोठ्या त्वेषाने पुढे येत आहेत.केवळ 23 वर्गीय तरुणीची नुकतीच सचिव म्हणून निवड झाली .ती सर्वात तरुण अधिकारी आहे.

युपीएससी कडे स्वतंत्र करिअर म्हणून पाहून त्याकडे लोकसेवेचे साधन म्हणून पाहणारा मोठा वर्ग आहे.हा तरुण वर्ग  एका ध्येयवादाने झपाटलेला आहे.लोकांची सेवा करण्यासाठी सरकारी नोकरी हा एक प्रवाह आहे अर्थात खाजगी क्षेत्रात स्वतःचं करिअर करणारी पिढी खूप मोठी आहे.सर्वांना सरकारी नोकरी मिळते असे नाही परंतु अधिकार हातात आले तर गोरगरिबांसाठी दरिद्री लोकांसाठी बेरोजगारांसाठी काही करता येईल या ध्येयवादाने झपाटलेले असंख्य तरुण-तरुणी रात्रंदिवस अभ्यास करत आहेत.

अंकुर गर्ग नावाचा उत्तर भारतातील तरुण (yuva) केवळ एकविसाव्या वर्षी आयएएस अर्थात जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी झाला .अगदी महाराष्ट्रातील आपल्या सातारा जिल्ह्यातील उदाहरण द्यायचे म्हटले तर कोरेगावच्या स्नेहल बर्गे या कन्येने पदवी प्राप्त केल्या नंतर लगेच वयाच्या एकविसाव्या वर्षी उपजिल्हाधिकारी पद मिळवले.इतकेच नव्हे ;तर त्या संपूर्ण राज्यात पाचव्या आणि मुलींमध्ये पहिल्या आल्या.हे उदाहरण सातारा जिल्ह्यात ठळकपणे समोर येते.

मात्र संपूर्ण भारताचा इथे आपल्याला साकल्याने विचार करता असे लक्षात येते की सरकारी नोकरी ही केवळ सेफ आहे सुरक्षित आहे समृद्धी देणारी आहे म्हणून करायची असा मतप्रवाह मागे पडत असून शेकडो देशबांधव त्यांची गरीबी शेतकरी कामगार यांचे पिचलेली शोषित वंचित लोकांचीअसलेली अवस्था दूर करण्याचे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून अधिकारी पदाची नोकरी आहे असा विचार करणारे तरुण तरुणी पुढे येत आहेत…..!

ग्रामीण भागात सुद्धा गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, विक्रीकर अधिकारी, आयकर अधिकारी, पोलीस उपाधिक्षक, फौजदार, बँक अधिकारी अशा पदांसाठी रात्रंदिवस झगडणारी तरुण (yuva) पिढी भारतात आहे.तरुण पिढी   बिघडली असं म्हणण्याचा जुन्या लोकांचा एक प्रघात आहे .

परंतु प्रत्येक पिढी असे म्हणत असते .अनेक गुण दुर्गुण या सह प्रत्येक पिढी पुढे जात असते.ध्येयवाद हा या पिढीचा प्रमुख विशेष आहे .तशी पिढी बिंदास्त आहे.परंतु ;बेफिकीर नाही .या पिढीला स्वतःच्या इच्छेने पुढे जायचे आहे.परंतु ती कुणाचा अनादर करत नाही .या पिढीला समजून घेत पुढे जाणे गरजेचे आहे.आजची तरुण (yuva) पिढी धाडसी ,पराक्रमी, आक्रमक आहे.नवीन तंत्रज्ञानाबरोबर जुन्या संस्कृतीची सांगड घालण्याची कला बहुतांशी तरुण पिढीला जमली आहे.आधीची आणि आत्ताची पिढी बरोबर घेऊन जाण्याचा पराक्रम तरुण करीत आहेत .

जे आम्हाला पटत नाही, त्याचा विरोध करताना तरुण (yuva) आक्रमक होतातच …उदाहरणार्थ निर्भया प्रकरण किंवा अगदी सध्याचे डॉक्टर प्रियंका रेड्डी प्रकरण होय…या दोन्ही बाबतीत तरुण-तरुणी एकत्र आल्या आणि सामाजिक, नैतिक दृष्ट्या आपले विचार प्रकट केले.प्रत्येक पिढी अनुकरणप्रिय असते.पाश्चात्य देशातील संस्कृतीचे आक्रमण करायला आपल्या पिढीला आवडते.

परंतु त्याबरोबर भारतीय संस्कृतीत काय महत्त्वाचे आहे, आंध्रप्रदेशात काय संस्कृती आहे, गोव्यातील संस्कृती काय आहे, काश्मीरमधील संस्कृती नेमकी काय आहे आणि गुजरात मधील जिलेबी फाफडा किती छान लागतो …या सर्वांचा साकल्याने विचार करत ही पुढे जाणारी पिढी आहे .प्रत्येक क्षेत्राचा सूक्ष्म विचार करणारी ही पिढी आहे.वरवर विचार करून “मला काय त्याचे ?” असे म्हणणारे हे तरुण-तरुणी नाहीत .त्यांचा एक निश्चित विचार असतो.हा विचार साकल्याने केलेला असतो .बऱ्याच वेळी तो चुकू सुद्धा शकतो परंतु ठामपणा या पिढीचा गुण आहे .

बिहारमधील पटणा येथील आनंदकुमार या तरुण शिक्षकांन गरीब मुलांना शिकवायचे ठरवले .ही गोष्ट 21 व्या शतकातील आहे…गरीब मुलांना मोफत शिकवणे आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे हे सर्व व्रत आनंदकुमार यांनी स्वीकारल आणि प्राणपणाने राबवीत आहेत .तीस अत्यंत गरीब मुलांची निवड करून “सुपर थर्टी” नावाचा ग्रुप ते स्थापन करतात आणि आता त्यांचा हा समाजहितैषी दृष्टिकोन इतका प्रसिद्ध झाला आहे की ऋतिक रोशन ने अभिनय केलेला सुपर थर्टी हा चित्रपट सुद्धा त्यामुळे निर्माण केला गेला आणि तो प्रेक्षकांना प्रचंड आवडला सुद्धा! 

केवळ झिंगाट म्हणत सैराट होणारी ही पिढी नाही; तर योग्य ठिकाणी गंभीर सांगोपांग विचार करून प्रत्येक पैलूचा विचार करणारी ही पिढी आहे .उदाहरणार्थ, राजकारण हे क्षेत्र निवडले तरी केवळ ठराविक तरूण या क्षेत्राचा पूर्ण विचार करायचा; परंतु आता प्रत्येक क्षेत्रातील तरुणाला विकासाभिमुख, समाजाभिमुख आणि समाजहितैषी राजकारणाचा ओढा लागला आहे.त्यादृष्टीने तरुण-तरुणी सूक्ष्म विचार करत आपली राजकीय विचारप्रणाली पक्की करीत आहेत.अनेक तरुण-तरुणी प्रत्यक्ष राजकारणात कार्यरत आहेत.नवनियुक्त खासदारांमध्ये तरुण खासदारांची संख्या लक्षणीय आहे.

आता छोटा संकुचित विचार करणारी पिढी नाही.भारतीय पिढी ही विश्वाला आधारभूत मानून भारताला केंद्रस्थानी ठेवून विचार करणारी आहे.मला जे आवडते ,ते मला जे पटते ते मी बोलणार आणि ते मी करणार असा या पिढीचा विचार आहे.तरीही  इतरांचा मतप्रवाह लक्षात घेणारी ही पिढी आहे .म्हणूनच कंगना राणावत सारख्या तरुण (yuva) अभिनेत्रीला राणी लक्ष्मीबाई चे चरित्र मनिकरनिका चित्रपटातून रेखाटावे असे वाटले, दीपिका पदुकोण या अभिनेत्रीला राणी पद्मावती चे चरित्र जगावेसे वाटले, प्रियंका चोप्रा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अभिनेत्रीला बाजीराव च्या पत्नीची अर्थात काशीबाईची भूमिका करावीशी वाटली.!हा सगळा वैचारिक, सामाजिक आणि नैतिक एकात्मतेचा भाग आहे . 

भारत हा तरूण मुळेच घडत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .परंतु समयसूचकता दाखवून जुन्या-नव्या विचाराचा सुवर्णमध्य साधणे खूप महत्त्वाचे असते.ते ही पिढी शोधत आहे असे स्पष्टपणे जाणवते .जिथे चूक आहे, जिथे भ्रष्टाचार आहे जिथे दुराचार आहे तिथे ही पिढी आता स्पष्टपणे बोलून दाखवते .मी गरीब आहे ,मी लाचार आहे ,माझे कोण ऐकणार असा विचार आता तरुण-तरुणी करत नाहीत.व्यसनाधीनता आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आणि वाईट खोटारडा प्रचार यापासून मात्र नव्या पिढीने स्वतःचे संरक्षण करायला पाहिजे.

अर्थात याबाबत आता या पिढीला समजू लागले आहे की व्हॉट्सॲप वर येणारा प्रत्येक मेसेज अथवा व्हिडीओ खरा असतो असे नाही .तसेच ;फेसबुकला येणारी प्रत्येक माहिती खरीच असते असेही नाही .त्यामुळे ही पिढी नक्कीच तेवढे जागरूक आणि चाणाक्ष आहे.तरुणां समोरील आदर्श कैलासवासी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले.याचं कारण असं होतं की त्यांचा तरुणांवर विश्वास तर होताच शिवाय संपूर्ण जगातील सातशे ते आठशे कोटी लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त तरुण लोकसंख्या ही भारताकडे आहे.भारतामध्ये वैविध्य आहे.

28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशात हा तरुण स्वतःच्या विचारांसह भौगोलिक दृष्ट्या विखुरलेला असला तरी वैचारिक दृष्ट्या एक आणि सक्षम आहे.आयटी इंजिनिअर ,संशोधन अशा विषयांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व अनेक तरूण करत आहे आणि करत राहतील.पुढच्या पिढीत जगात सगळ्यात जास्त भारताकडे इंजिनिअर, डॉक्टर ,संशोधक असतील.जे भारताला महासत्ता बनतील.ही युवाशक्तीच भारताला महाशक्ती बनवेल, असा या शास्त्रज्ञांचा ठाम विश्वास आहे.अनेक शास्त्रज्ञही तरुण आहेत.कलाकारही तरुण आहेत.विचारवंत सुद्धा तरुण आहेत आणि अनेक साहित्यिक सुद्धा काव्य, निबंध ,लेख ,चरित्र अशा माध्यमातून कसोशीने लेखन करीत आहे.

तरुणांनी नव्यानव्या व्यसनांपासून स्वतःचे संरक्षण केले पाहिजे .एखाद्या देशाला युद्धात हरवायचे असेल तर तात्पुरता शस्त्रास्त्रे वापरून हरवता येईल .परंतु; कायमस्वरूपी नेस्तनाबूत करायचे असेल तर तेथील युवापिढीला वाईट व्यसन लावले की  तो देश संपूर्ण नेस्तनाबुत होतो.असे विद्वानांनी म्हटले आहे..भारतीय तरुण तंत्रज्ञानाशी जोडले गेल्यामुळे तो एक होऊन पुढेच राहत आहे.त्याला इंटरनेटमुळे जगाचा अभ्यास घरी बसल्या करता येत आहे.मोबाईल मुळे जोडला गेला आहे.टीव्ही मुळे सर्व प्रकारचे ज्ञान घरबसल्या मिळत आहे.

तरीही युवा पिढीचे नीट संगोपन, प्रबोधन आणि शिक्षण झाले तर उद्याचे शिवाजीमहाराज ,उद्याचे विवेकानंद, उद्याचे भगतसिंग, उद्याचे गुरुनानक, उद्याचे संत ज्ञानेश्वर याच पिढीतून जन्माला येतील.आता कोणतेही राज्य भारतामध्ये तरुणांना वर्ज राहिलेले नाही .राज्य, सीमा ,भाषांच्या सीमा ओलांडून तरुण बिनधास्तपणे ,भारत माझा देश आहे, अशा भावनेने नोकरीसाठी जात आहेत.रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत.

समाजसेवा या क्षेत्रातही तरुण मागे नाही ,हे अभिमानाने सांगावेसे वाटते .काही तरुणांनी तर काश्मीर मध्ये जाऊन जी कुटुंबे दहशतवादाला बळी पडले त्या कुटुंबातील मुलांचे संगोपन करण्याचा विडा उचलला आहे…जगप्रसिद्ध बाबा आमटे यांच्या कुटुंबातील नवीन पिढी पुन्हा समाजसेवेत येत आहे.सुप्रसिद्ध समाजसेवक डॉक्टर स्मिता आणि रवींद्र कोल्हे यांचे सुपुत्र डॉक्टर राम एमबीबीएस करीत असून डॉक्टर झाल्या झाल्या मेळघाटमधील आदिवासींची सेवा करणार आहे.

असंख्य स्वयंसेवी संघटना आहेत . तरुण समाजसेवेसाठी पुढे येत आहे त्याग आणि बलिदान केवळ पूर्वी होता;असे नाही.तर आत्तासुद्धा तरुणांना त्याची किंमत माहित आहे.केवळ बेरोजगारी आणि नवीन आव्हाने यामुळे तो कुठेतरी पिचलेला कधीतरी निराशा ग्रस्त वाटतो एवढेच ! 

जुन्या पिढीचे आणि अनुभवी नागरिकांचे हेच कर्तव्य आहे की तरुण पिढीला कमी लेखू नये.त्यांच्यातील वैगुण्य ,काही अंशी अपरिपक्वता  लक्षात घेत घेत त्यांच्यातील चांगले गुण हेरावेत.त्यांना पाठिंबा द्यावा ,प्रोत्साहन द्यावे आणि पुढे चालावे .शेवटी ही तरुण पिढी भारताला घडवणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे…!

संपूर्ण जगातील लोकसंख्येपैकी 200 ते 210 कोटी तरुण (yuva) आहेत.त्यापैकी 40 ते 50 कोटी एकट्या भारतातील आहेत.ही खूप मोठी शक्ती आहे .नवा प्रगतिशील, सर्वगुणसंपन्न ,विचारशील भारत विचारात घेतला तर तरुणांच्या समस्या आणि आव्हाने सक्षमपणे आपण हाताळली पाहिजेत..मग पहा; ही युवाशक्ती काय कमाल करून दाखवते..!!

  • यशेंद्र क्षीरसागर

    कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

HomeBlogSearch Google

Leave a Reply

Close Menu