Smita Patil – #1 – The Best Actress

smita patil

Smita Patil

13 डिसेंबर हा स्मिता पाटील यांचा पुण्यस्मरण दिवस. त्यानिमित्त लेख

आपल्या सशक्त आणि दर्जेदार अभिनयामुळे चित्रपटसृष्टीवर अजरामर छाप सोडणार्‍या स्मिता पाटील या मनस्वी अभिनेत्रीची आज पुण्यतिथी .त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा आढावा💐 (Smita Patil)

स्मिता,आज तू हवी होतीस..!

Smita Patil  

बोलके ,विद्रोही डोळे ,सावळा शिडशिडीत देह ,तरुणपणीच चेहऱ्यावर आलेली परिपक्वता आणि त्या जोडीला अभिनयाची उत्कृष्ट जाण या सोनेरी संगमामुळे स्मिता पाटील (smita patil) या मराठमोळ्या अभिनेत्रीने संपूर्ण देशाच्या चित्रपट सृष्टीवर अजरामर छाप सोडली….कमालीची मनस्वी अभिनेत्री असलेल्या स्मिताचा जन्म 1955 मध्ये पुण्यात झाला.वडील राजकारणी आणि आई समाजसेविका असलेल्या दांपत्याच्या पोटी जन्म झालेल्या स्मिताला श्याम बेनेगल या पद्मविभूषण प्राप्त जगप्रसिद्ध दिग्दर्शकांची साथ लाभली.

चरणदास चोर या चित्रपटातून स्मिताचे आगमन झाले.त्यावेळी तिचे वय वीस वर्षे सुद्धा नव्हते.या मुलीमध्ये प्रचंड अभिनयक्षमता आहे आणि कमी वयात आलेली सामाजिक दृष्टी आणि परिपक्वता आहे हे श्याम बेनेगल या दर्जेदार भारतीय दिग्दर्शकांनी ओळखले आणि त्यानंतर एक अद्भुत अभिनेत्रीचा अजरामर प्रवास सुरू झाला…..!!!शाम बेनेगल यांच्याबरोबरच गोविंद निहलानी यांच्यासारखे दिग्दर्शकही स्मिताला लाभले.त्यामुळे तिचा अभिनय अधिकच निखरत गेला.

मंथन मधून गिरीश कर्नाड बरोबर स्मिता अत्यंत आत्मविश्वासाने उभी राहिली.अभ्यासू आणि दर्जेदार दिग्दर्शकांनी ओळखले होते की स्मिता मध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे आणि वयाच्या पंचविशीत तरुणांमध्ये अभावानेच आढळणारी अद्वितीय प्रगल्भता आहे.त्यातूनच मंथन ,आक्रोश ,चक्र, भूमिका ,मिर्च मसाला ,चिदंबरम असे चित्रपट एकापाठोपाठ एक आकार घेत गेले.1975 ते 1985 अशा केवळ दहा वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत स्मिता पाटील यांनी अत्यंत अर्थपूर्ण भूमिका जगल्या.

कुलभूषण खरबंदा, नसिरुद्दीन शाह ,ओम पुरी, अमरीश पुरी, गिरीश कर्नाड अशा सशक्त रंगभूमीवरच्या कलाकारांबरोबर स्मिताने लीलया अभिनय केला …केवळ अभिनय केला असे नव्हे तर ती प्रचंड आत्मविश्वासाने या महान कलाकारांसोबत वावरली .कुठेही नवखेपणा न जाणवता तिने आपल्या भूमिका साकारल्या .1977 श्याम बेनेगल दिग्दर्शित, “भूमिका” या चित्रपटासाठी वयाच्या केवळ 22 व्या वर्षी स्मिताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला..!!या चित्रपटात तिने अभिनेत्रीची चढ-उतार युक्त वाटचाल अत्यंत सशक्तपणे उभी केली .ही भूमिका अनेक रंगी होती.

प्रत्यक्ष चित्रपट कलाकाराची ही भूमिका होती.वयाच्या केवळ 22 व्या वर्षी एका तरुण मुलीच्या आईची तसेच; अनेक पुरुषांचे विचित्र अनुभव आलेल्या स्त्रीची भूमिका साकारणे प्रचंड आव्हानात्मक काम होते.या भूमिकेत खूप ताणतणाव- ताणेबाणे आणि वाटावळणे आहेत…म्हणूनच या अवघड भूमिकेसाठी स्मिताला वयाच्या पंचविशीच्या आतच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गौरविण्यात आले’ आणि त्यानंतर 1981 मध्ये “चक्र” चित्रपटासाठी पुन्हा एकदा स्मिता पाटील यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरव झाला.

दरम्यान आक्रोश या चित्रपटातूनही ओम पुरी आणि नसरुद्दीन शहा यांच्याबरोबर तिने खूप सुंदर भूमिका साकारली.आक्रोश या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद निहलानी होते.1975 सालच्या आसपासच्या काही वर्षातच स्मिताने उंबरठा, सामना आणि जैत रे जैत असे अत्यंत दर्जेदार वेगळ्या धाटणीचे आणि आशयघन मराठी चित्रपट केले ..असे चित्रपट आणि त्यातील भूमिका साकारणे तरुण वयातील मुलीला अत्यंत आव्हानात्मक आणि अवघड होते.”मी रात टाकली, मी कात टाकली “म्हणत जंगलात फिरणार्‍या आदिवासी तरुणीची जैत रे जैत मधील भूमिका कोणीच विसरू शकणार नाही ,तर उंबरठा मधील प्रगल्भ स्त्रीची भूमिका अजरामर झाली आहे.

समांतर म्हणजेच कलात्मक चित्रपटातून रमलेल्या स्मिताला दर्जेदार आणि जीवनाच्या जवळ जाणाऱ्या वास्तव भूमिकांचे जणू वेडच लागले होते.तिला समाज समजला होता ,तिला माणसे समजली होती, तिला मानवी संबंधांमधील तानतनाव समजले होते …या सर्वच वैशिष्ट्यांची जाणीव तिची प्रत्येक भूमिका पाहताना होते .महत्त्वाची गोष्ट अशी की दर्जेदार पुरुष कलावंतसमोर ही तरुण मुलगी बुजली नाही .लाजली नाही.कुलभूषण खरबंदा सारख्या कलाकाराबरोबर सुद्धा आत्मविश्वासाने तिने “अर्थ” चित्रपटात अत्यंत महत्त्वाची कसदार भूमिका केली.शबाना आजमी सारख्या ताकदीच्या कलाकार मैत्रिणी सोबत तिने भूमिका केल्या.

ज्या वयात तरुणींना अल्लडपणा, लग्नाची स्वप्ने पडतात आणि केवळ मौजमजा याखेरीज आयुष्याचा अर्थ समजत नाही, त्या तरुण वयात म्हणजे वयाच्या वीस वर्षापासून ते 1986 ला निधन होईपर्यंत म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षापासून वयाच्या एकतिसाव्या वर्षापर्यंत स्मिता मध्ये एक अद्वितीय, अद्भुत अशी प्रगल्भता विराजमान होती..!!समांतर चित्रपट करत असतानाच ‘नमक हलाल’ सारखा आणि ‘शक्ती’ सारखा व्यवसायिक चित्रपटही तिने केला.नमक हलाल मध्ये त्याकाळच्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ती सहज रमली तर शक्तीमध्ये बापाच्या आणि मुलाच्या तानतनावयुक्त संबंधांमध्ये तणावात असलेली रोमा तिने अत्यंत सहजपणे साकारली.

शक्ती चित्रपटाच्या वेळी तिचे वय जेमतेम 26 ते 27 होते.महत्त्वाचे असे की भारतातील दोन सुपरस्टार अभिनयसम्राट दिलीपकुमार आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन तसेच ;कसदार आणि दर्जेदार अभिनेत्री राखी यांच्यासोबत पडद्यावर वावरणे आणि तेही एखाद्या गंभीर भूमिकेत वावरणे; हे निश्चितच सोपे नव्हते.परंतु ही भूमिका तिने अत्यंत सुंदरपणे रेखाटली.1980च्या आसपासच अमृत, कसम पैदा करने वाले की असे चित्रपट येत राहिले..अमृत मधून राजेश खन्ना बरोबर तिने अत्यंत प्रगल्भ विशेष म्हणजे वृद्ध स्त्रीची भूमिका साकारली.

वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आणि तणाव तिने सोसले भोगले.राजबब्बर यांच्याशी झालेल्या विवाहानंतरही खूप टीकाटिपणी तिला सहन करावी लागली .परंतु मुळातच सहनशील असणाऱ्या स्मिताने हे वादळ पचवले.केवळ एकतिसाव्या वर्षी स्मिता देवाघरी गेली .परंतु दहा वर्षांच्या कारकिर्दीत तिने 100 हून अधिक चित्रपट केले.हे अत्यंत महत्त्वाचे आहे.1980मध्ये तर एकाबाजूला नमक हलाल सारखा व्यवसायिक चित्रपट आणि दुसऱ्या बाजूला कलात्मक चित्रपट तिने साकारले.

ह्या दोन बाबींमध्ये स्वतःला सिद्ध करणे एवढे सोपे नसते .श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, रमेश सीपी, जब्बार पटेल अशा कसदार दर्जेदार दिग्दर्शकांबरोबर काम करणे हे वाटते तितके सोपे नाही.कारण तिथे दर्जा आणि भूमिका समजून घेण्याची ताकद महत्त्वाचे असते.परंतु या सर्व कसोटीवर स्मिता 100% उत्तीर्ण नव्हे तर विशेष योग्यतेसह पास झाली.वयाच्या केवळ एकोणतिसाव्या वर्षी तिला मानाचा भारत सरकारचा पद्मश्री सन्मान प्राप्त झाला.केवळ दहा वर्षात अजरामर कारकीर्द घडवणाऱ्या या मनस्वी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.आज स्मिता असती तर 64 वयाची असती …आणि तिने शेकडो सशक्त भूमिका साकारल्या असत्या त्यामुळे “स्मिता, आज तू हवी होतीस…’अशी भावना दाटून येते…आणि मनाला हुरहूर लागते…💐

Smita Patil

  • यशेंद्र क्षीरसागर
    (चित्रपट अभ्यासक समीक्षक)

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Smita patil film festival 

Smita patil youtube video songs

Smita patil youtube video songs

Smita patil youtube video songs

Home BlogSearch Google

Leave a Reply

Close Menu