Social Media -प्रगत भारतासाठी हवा, नियंत्रित सोशल मीडिया..! – #369 – The Best

प्रगत भारतासाठी हवा, नियंत्रित सोशल मीडिया..!

(Social Media)

आज आपण आधुनिक विचारांच्या देखील पुढे गेलो आहोत.समाज आणि मानव एकमेकापासून वेगळे काढता येणार नाहीत.प्रत्येक पिढीनुसार समाजशास्त्राची आणि अगदी माणुसकीची व्याख्या बदलत जाते.कोणी कोणाशी कसे वागावे ,कसे बोलावे आणि इतिहासाचा अर्थ कसा लावावा इथपर्यंत चर्चा घडत असतात…अनेक वेळा अनेक व्याख्या जुन्या होत असतात.मुळात मीडियाच अस्तित्वात नव्हता, तेव्हा माणूस माणसाशी खूप कमी संबंध ठेवून होता.

सोशल असणे म्हणजेच सामाजिक असणे ही गोष्ट आता फॅशन झाली आहे…जर जुना विचार केला तर अनेक गमतीजमती डोक्यात येतात.भाऊबीजेला जाणारा भाऊ सुद्धा चार-सहा दिवस अगोदर घरातून निघायचा बैलगाडीतून जायचा किंवा चालतही जायचा.सोबत दशमी घेऊन जायचा त्या वेळेला एक ओढ होती….व्हाट्सअप होते, ना इंस्टाग्राम होते, ना मोबाईल होता ना फेसबुक होते.मात्र ती अजब ओढ होती.

नंतर आपण विज्ञानमय झालो आणि काही क्षणात एकमेकांशी संपर्क साधू लागलो .अनेक वेळा असे वाटते की संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली; अथवा सतराव्या शतकात संत तुकारामांनी चार हजार अभंग लिहिले, तेव्हा प्रसिद्धीची, छपाईची सोयच नव्हती…तेव्हा लाइक नव्हते .तेव्हा कॉमेंट नव्हती.तेव्हा शेअरही नव्हते.जो काही जनसमुदाय समोर असायचा त्याच्याशीच आपल्या भावना आणि विचार शेअर करायचे.

संत ज्ञानेश्वरांनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीतेवरील निरूपण अथवा टीका लिहिली ;त्या वेळी त्यांना या ज्ञानेश्वरीचा प्रचार किंवा का प्रसार कसा होईल याची काळजी नव्हती.कारण काहीतरी तळमळीने सांगावे, हाच त्यांचा उद्देश होता..महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म अशी पुस्तके असोत किंवा 1855 ला लिहिलेले तृतीय रत्न नाटक असेल..तसेच संत तुकडोजी महाराजांनी गेल्या शतकात लिहिलेली ग्रामगीता असो ;अशा अनेक कलाकृतींना, त्यावेळेला आजच्या भाषेत सांगायचे तर पब्लिक रिस्पॉन्स झटपट नव्हता.

काही वर्षांनी काही दशकांनी काही शतकांनी ही साहित्यकृती ही विचार जनतेपर्यंत पोहोचतील अशी त्यांची अपेक्षा होती.आता लगेच रिस्पॉन्स हवा असतो आता केवळ मीडियाचं नव्हे तर सोशल मीडिया(social media) अस्तित्वात आला आहे.आपण कसे असतो त्यापेक्षा आपण कसे दिसतो हे आता महत्त्वाचे झाले आहे .

मला काय शोभते याच्यापेक्षा लोकांना काय माझ्याबाबत बरे वाटते याची काळजी असते.अर्थात आता एकविसाव्या शतकात समाज बदलत आहे.दारिद्र्य, बेरोजगारी, गुन्हेगारी अशी आव्हाने येत आहेत.म्हटलं तर प्रगती किंवा म्हटलं तर सूज असे काहीतरी जन्माला येत आहे ..!!आणि या सर्वांपासून दूर जाणे आज शक्य नाही .त्यामुळे सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांकडे उघड्या डोळ्यांनी, निरपेक्षपणे ,अगदी “शिक्षकाच्या नजरेने” तर ;कधी “मित्रत्वाच्या आपुलकीने पाहणे” अत्यंत गरजेचे झाले आहे.

एखाद्या गोष्टीची खूप प्रगती झाली ,खूप प्रचार झाला, खूप प्रसार झाला की एक कमीपणा येऊ लागतो, तो कमीपणा किंवा तो कंटाळा सोशल मीडिया (social media) बाबत आता काही स्तरावर जाणवू लागला आहे.ही स्वागतार्ह बाब आहे.कारण भात व्यवस्थित शिजण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे हे महत्त्वाचे आहे तसेच; त्यात किती मीठ टाकावे, हेदेखील महत्त्वाचे आहे.हळूहळू जसे आपण भात शिजत जातो ,तसे समजत जाते की पाणी आणि मिठाचे प्रमाण कसे असावे? तसेच सोशल मीडियाचे सुद्धा आहे.

एका ठिकाणी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना मी सहज म्हटले होते की ;”आज समाज खूप जवळ येत आहे.परंतु इतकाही जवळ यायला नको की लोकांचे एकमेकांना धडकून ऍक्सीडेन्ट होतील”.यातील गमतीचा भाग जरी सोडला तरी “अतिपरिचयात अवज्ञा” किंवा संत एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे “अति तेथे माती “होतच असते..
त्यानुसार सोशल मीडिया हा ,तत्व ,व्हॅल्यू आणि सुविचार याच्याभोवतीच स्थिरावलेला असायला हवा, असे मनोमन वाटते.अर्थात तरुण पिढी नवीन काळ बदलत्या आकांक्षा आणि मौजमजा करण्याची वृत्ती चंगळवाद हे सर्व लक्षात घेतले तर सोशल मीडिया (social media) सुद्धा त्या कचाट्यातून सुटणार नाही!सगळेच कसे गंभीर आणि सगळेच कसे तत्त्वज्ञान भोवती फिरणारे ,असं कुठल्याच बाबतीत होऊ शकत नाही! अगदी एखाद्या महाविद्यालयात सुद्धा संपूर्णतः सगळेच विद्यार्थी स्कॉलर कसे असतील ?

सगळेच गृहस्थ घरात काम करणारे कसे असतील ?तसेच सोशल मीडियामध्ये सुद्धा पूर्णतः सर्व कसे पवित्र सुंदर असे असू शकत नाही…घराबाहेर तुळस असावी हे खरे आहे परंतु अपार्टमेंटच्या बाबतीत काय करायचे? असे काहीसे सोशल मीडिया बद्दल झाले आहे . लेखकांनी लेख लिहावेत, कवीने कविता लिहाव्यात, ज्यांना चांगले विचार असतील त्यांनी चांगले विचार लिहावेत आणि अशा सर्व साहित्याचा प्रचार सोशल मीडियातून व्हावा ,असे ढोबळमानाने अपेक्षित आहे.

लवकरात लवकर एकमेकांपर्यंत संदेश पोहोचावेत आणि त्याचा फायदा समस्या निवारणासाठी किंवा निदान तत्कालीन आनंद प्राप्तीसाठी हवा, असा एक सज्जन विचार मनात नक्कीच डोकावतो.कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात ,”संस्कृती म्हणजे रंगलेले ओठ ,संस्कृती म्हणजे प्रचार आणि जाहिरात”…….मंगेश पाडगावकर सरांच्या या वाक्यात गहन अर्थ दडलेला आहे.प्रचार, जाहिरात आणि खोटी रंगरंगोटी या सर्वाचाच सोशल मीडिया (social media) गुरफटत आहे की काय असे अनेकांना वाटते .अर्थात ही भीती अनाठायी नाही.अनेक वेळा राजकीय तसेच सामाजिक विचार प्रणालीच्या संघर्षामध्ये सोशल मीडियाचा हत्यार म्हणून उपयोग होतो.

त्यातील पावित्र्य नष्ट होते.एकसुरीपणा येतो .कंपू ,गट तयार होतात.मतात प्रेमाचा आग्रह नसून एक प्रकारचा खुनशीपणा येतो.कोणत्याही माध्यमाला खुनशीपणा पासून आणि दुराग्रह पासून वाचवणे हे जबाबदार नागरिकांची सुशिक्षितांची सुसंस्कृत व्यक्तींचे एक मोठे कर्तव्यच आहे..!!!

अशा दृष्टिकोनातून विचार केला तर सोशल मीडियाचा सुंदर वापर होऊ शकतो.म्हणूनच प्रगत भारत होण्यासाठी सोशल मीडिया नियंत्रित असला पाहिजे .असा घराचा विचार केला तर मुलांना स्वातंत्र्य दिले म्हणजे त्यांनी स्वतःची कामे करू नयेत असा होत नाही.स्वतःचे अंथरूण सुद्धा घडी घालत नसलेला मुलगा कितीही प्रगत झाला तरी काय कामाचा? दिवसभर कामावरून आई किंवा वडील घरात थकून भागून आल्यावर त्यांना पाण्याचा ग्लास हातात देणारी मुलगी किंवा मुलगा नसेल तर त्यांचे शिक्षण काय कामाचे?

असेच सोशल मीडिया (social media) बद्दल आहे .गमतीजमती ,विनोद, मिश्कील चित्रे तसेच अत्यंत हलकेफुलकेपणाने केलेले कॉमेंट्स हे सोशल मीडियावर नक्कीच स्वागतार्ह आहेत.कारण सार्वजनिक जीवनात सुद्धा आपण ह्या गोष्टी करत असतो.सोशल मीडियाचा अत्यंत सुंदर वापर करता येतो .एखाद्या वर्तमानपत्रात एखादा लेख किंवा कविता छापून आली तरी ती काही हजार अथवा काही लाख याच वाचकांपर्यंत पोहोचू शकते .

मात्र ,त्याच लेखाचा फोटो, झेरॉक्स अथवा ऑनलाईन पिक्चर जर फेसबुक, व्हाट्सएप ,इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियाच्या साधनांमधून प्रसारित करण्याला प्रचंड वाव आहे .राज्यात देशात नव्हे तर संपूर्ण जगात विचार क्षणार्धात पोचू शकतात.त्यामुळे असंख्य व्यक्तींपर्यंत हे विचार पोचून एक नवक्रांती सुद्धा घडू शकते .असे अनेक अनुभव अनेकांना येत असतात.आपल्या मनातल्या भावना अनेकांपर्यंत पोहोचावे असे वाटते .परंतु ते पोहोचण्याचा भक्कम मार्ग नसतो.

अशा वेळी सोशल मीडिया (social media) हा एक खूप मोठा पर्याय नसतो .त्याचा नीट वापर केला तर करोडो लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचता येते .सकारात्मक विचार पोहोचवता येतात.सामाजिक तळमळ असणाऱ्या समाजसेवक, समाजसुधारक अथवा विचारवंतांना तसेच ;अनेक अभ्यासकांना मग ते शैक्षणिक, सांस्कृतिक असो !सोशल मीडिया हा एक मोठा दिलासा ठरत आहे .ही बाब खरी आहे. अर्थात सकारात्मक वापर ही सोशल मीडियाची खरी शक्ती आहे.एखादा राजकीय विचार पटला नाही, तर त्याचा विषारीपणे प्रचार करणे किंवा त्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीच्या अश्लील अथवा अभद्र कॉमेंट्स करणे असे प्रकार खूप घडत आहेत.

हा सोशल मीडियाच्या पवित्र हेतुला फासलेला हरताळ आहे.!अनेक संकटांचा परिस्थितीत जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा सुद्धा फेसबुक आपला व्हाट्सअप ग्रुप खूप मोठी भूमिका बजावतात तेव्हा खूप आनंद वाटतो.नियंत्रित सोशल मिडीयाचे हे खूप सुंदर उदाहरण आहे.अनेक वेळा व्यक्तिशः समूहांवर किंवा गावावर खूप मोठी संकटे येतात.परंतु ;त्या संकटाचा मुकाबला कसा करायचा, याचे ज्ञान नसल्यामुळे ही गावे अथवा व्यक्ती मदतीपासून वंचित राहतात .अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी सोशल मीडिया तुन आवाहन केले तर खूप मोठे हेतू साध्य होऊ शकतात .भूकंप, सुनामी ,महापूर अशा मोठ्या आपत्तींत वेळी सोशल मीडिया (social media) ने खूप मोठी भूमिका बजावली आहे आणि बजावत आहे.भीती फक्त एवढेच आहे की पिढीने खोटेपणा, वरवरचा दिखाऊपणा या गोष्टींना सोशल मीडियाच्या माध्यमातून बळी पडू नये, अशी रास्त अपेक्षा आहे.

खराखुरा आनंद कशात आहे ; न समजल्यामुळे आभासी दुनियेमुळे समोरच्या माणसाला कमी किंमत द्यायची आणि लांब असलेल्या कोणालातरी गुड मॉर्निंग गुड नाईट म्हणायचे अशी विचित्र संस्कृती बोकाळल्याचा धोका आहे.अलीकडेच एक सुंदर उदाहरण सांगतो.अत्यंत दर्जेदार आणि मनस्वी भूमिका केलेली मराठी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील होय.

मंथन, चक्र, निशांत, भूमिका, उंबरठा ,जैत रे जैत ,सामना, शक्ती अशा अनेक चित्रपटात अत्यंत सशक्त अभिनय केलेल्या या अभिनेत्रीविषयी मी लेख लिहिला.काही शेकडो व्यक्तींपर्यंत पोहोचला असता परंतु तो मी व्हाट्सअप वर व्यवस्थित टाईप करून त्याला स्मिता पाटील चे एक छान छायाचित्र जोडून प्रसारित करण्याचा प्रयत्न केला असता तो हजारो जनांपर्यंत पोचला.तसेच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला लेख फेसबुकवर प्रसारित केला तेव्हा त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळाला.अगदी आजच हा लेख लिहीत असताना 14 डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध महान प्रतिभेचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा वाढदिवस आहे.त्यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती लिहून व्हाट्सअप वर प्रसारित केलेली अनेकांना त्या बाबत माहिती समजली.

शिवाय मला सुद्धा प्रचंड आनंद वाटला.अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा फुले यांची पुण्यतिथी 28 नोव्हेंबरला होती .मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कवी म्हणून पैलू आणि त्यांना माहीत नव्हता त्यांनी अखंड नावाने कविता लिहिल्या म्हणून कवी महात्मा फुले यांचे कर्तृत्व काय होते ;अशा आशयाचा लेख लिहून मी तो फेसबुक व्हाट्सअप वरून प्रसारित केला.त्यामुळे या महान व्यक्तिमत्त्वाचा नवीनच पैलू शेकडो लोकांपर्यंत पोचला .सोशल मीडियाची ताकद ही अशी आहे .

अनेक समाजसेवकांची, समाजसुधारकांचे कार्य आपण लाखो लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवू शकतो.शुभेच्छा, गुड मॉर्निंग, गुड नाईट अथवा दुःखात सहभागी होणारे संदेश याबाबी तर नित्याच्याच झाल्या आहेत .परंतु त्याबरोबर सोशल मीडियाचा वापर सकारात्मक तसेच इतरांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी झाला तर त्या सारखा आनंद नाही .विषारीपणा, विखारीपणा स्वतःच्या मतांचा दुराग्रह, असहिष्णुता आदी गुणांचा संसर्ग जर सोशल मीडियाला झाला.तर त्यासारखे दुर्दैव नाही .

सहिष्णुता म्हणजेच आपल्यापेक्षा विरुद्ध मत असलेल्या मताचा ही आदर करणे होय….ही सहिष्णुता सोशल मीडियात सुद्धा सांभाळी गेली पाहिजे.तरच सोशल मीडियाला खरा अर्थ प्राप्त होईल, असे वाटते.अनेक स्पर्धा ,अनेक सवलती यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तसेच अनेक चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करून सर्व समूहांना, सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी सोशल मीडिया (social media) हे प्रभावी साधन आहे.
विद्यार्थी हा घटक तर सोशल मीडियाचा खूप मोठा भाग होऊ पाहत आहे .या विद्यार्थ्यांपर्यंत संत ,समाजसुधारक, समाजसेवक, चालूघडीचे समाजसेवक यांची माहिती पोहोचणे गरजेचे आहे.ती पोचण्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर होऊ शकतो .तशी धडपड सुद्धा करणारे घटक आहेत.

परंतु ;अत्यंत सकारात्मक आणि टोकाचा सामाजिक विचार करून सोशल मिडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.हे सुद्धा तितकेच खरे आहे !सोशल मीडिया (social media) ला नियंत्रित केले तर ही खूप मोठी चळवळ होऊ शकते.

सोशल मीडिया (social media) म्हणजे मौज मजा नाही तर सुखदुःखात सामील होऊन आनंद प्राप्ती करून घेण्याचा हा मोठा मार्ग आहे .आजच्या व्यवहारी जगात अनेक आव्हानांना आपण सामोरे जात असताना सोशल मीडियाचा वापर प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वतःची आत्मिक शक्ती, आत्मबल वाढण्यासाठी केला तर; सोशल मीडिया हे खूप मोठे समाजसुधारणेचे क्रांतीसाधन होऊ शकते; यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.

आधुनिक काळाच्या पलीकडे जाऊन आपण गरीब घटक ,दुर्दैवी घटक ,शोषित ,वंचित ,पीडित आदींना न्याय देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आणि या सोशल मीडियाला नियंत्रित केले तर तो सोनेरी क्षण असेल..

यशेंद्र क्षीरसागर

  • कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

HomeBlogSearch Google

Leave a Reply

Close Menu