Babasaheb Ambedkar – बाबासाहेबांचा पूजक – #1 – The Best

महापरिनिर्वाण दिन☘ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) पुण्यतिथी त्यानिमित्त लिहिलेला लेख☘


मी सदैव विद्यार्थी,
बाबासाहेबांचा पूजक!

 

Babasaheb Ambedkar – शिक्षण

आजन्म विद्यार्थी असावे असे कायमच विद्वानांकडून आणि सामाजिक तसेच; शैक्षणिक अभ्यासकांकडून नेहमीच सांगितले जाते.विद्यार्थ्यांनी ज्यांचे पूजक असावे, असे अनेक महापुरुष अजूनही दीपस्तंभाप्रमाणे आहेत.दलित, पीडित ,वंचित ,शोषित यांच्या उत्थानासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (dr Babasaheb Ambedkar) हे संपूर्ण जगाला मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि सामाजिक शिक्षक आहेत.

सर्व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे पूजक असलेच पाहिजे.त्याग ,अभ्यास, अखंड ज्ञानसाधना अशी वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असतात; ही सर्व वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटली होती .म्हणूनच 7 नोव्हेंबर हा दिवस ” शाळा प्रवेश दिन” म्हणून साजरा केला जातो.तर ,त्यांची जयंती हा ‘ज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो .

मध्यप्रदेशात महू येथे 1891 मध्ये जन्मलेल्या बाबासाहेबांनी अखेर पर्यंत म्हणजेच 6 डिसेंबर 1956 पर्यंत आयुष्यभर प्रचंड अपमान हाल-अपेष्टा सहन करत शिक्षण घेतले.हे शिक्षण कधीही भौतिक सुखासाठी नव्हते.आपल्या समाजातील वंचितांना, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे, हा त्यांचा शुद्ध हेतू होता .मुळात शिक्षणाचा हेतू असाच असावा लागतो; म्हणूनच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे पूजक असले पाहिजे.

पोटार्थी शिक्षण काहीच उपयोगाचे नाही.हे शिक्षण कदाचित पोट भरेल; पण तुमचे हृदय आणि मन समाधानी राहणार नाही, हे विचार चाणाक्ष बाबासाहेबांनी लहानपणापासूनच मनात रुजवले होते.प्रचंड विरोधाचा आणि प्रचंड विपरीत परिस्थितीचा सामना करत बाबासाहेबांनी एम. ए .,अर्थशास्त्रातली डिलीट, पीएच.डी ,बॅरिस्टर अशा अनेक पदव्या मिळवल्या.या पदव्या घेत असताना ज्ञानाची लालसा आणि चौफेर व्यक्तिमत्त्व घडवणे या दोन्ही हेतूंनी बाबासाहेब भारावले होते.म्हणूनच ते जगातले सर्वोत्कृष्ट आदर्श विद्यार्थी होते.

आजचा एकविसाव्या शतकातला विद्यार्थी हा बाबासाहेबांचा म्हणूनच पूजक असला पाहिजे .एखादी पदवी मिळवली तरी आज; ” मला नोकरी मिळत नाही”, म्हणून समाज व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करणारा विद्यार्थी पाहिला की बाबासाहेबांच्या निरपेक्ष कार्यकर्तृत्वाची तीव्रतेने आठवण येते.प्रचंड दारिद्र्य आणि अवहेलना यांचा सामना करत, घरातील असंख्य संकटांना सामोरे जात, बाबासाहेबांनी अखंड शिक्षण घेतले .

Babasaheb Ambedkar – रमाबाई 

त्यांना माता रमाबाई आंबेडकर यांनी फार मोठी साथ दिली.आई-वडिलांचा तसेच इतर मोठ्या व्यक्तींचा घरातून आशीर्वाद मिळाला. केवळ उपचाराला पैसे नाहीत म्हणून त्यांची मुले देवाघरी गेली.तरी त्यांनी आणि रमाबाईंनी धीर सोडला नाही.बाबासाहेबांनी शिक्षण चालूच ठेवले .रमाबाईंनी सुद्धा बाबासाहेबांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्या माऊलीने भयंकर संकटे एकटीने पचवली .

परंतु, बाबासाहेबांना कोणताही त्रास दिला नाही .या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर आजच्या विद्यार्थ्याला नक्कीच शिक्षणाचे मर्म आणि महत्त्व लक्षात येईल.शिक्षण घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी असीम त्याग असावा लागतो.हा त्याग बाबासाहेबांच्या रोमारोमात भिनलेला होता आणि रमाबाईंच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात मुरलेला होता .मनात आले असते तर बाबासाहेबांनी स्वतः विद्वत्तेच्या जोरावर खूप मजेत आयुष्य घालवले असते.

Babasaheb Ambedkar – ग्रंथसंपदा 

परंतु त्यांनी शिक्षणाचा उपयोग हा अखंडपणे वंचितांच्या, शोषितांच्या, दलितांच्या उद्धारासाठी केला.’द प्रॉब्लेम ऑफ रुपी’,’कास्ट इन इंडिया’, ‘द अनटचेबल्स’,’थॉट्स ऑन पाकिस्तान’ ,’बुद्ध अँड हिज धम्म ‘अशी अनेक आशयघन आणि ज्ञानप्रचुर पुस्तके, ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली.त्यांचे संस्थात्मक योगदानही मोठे होते .विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की संस्था केवळ पोट चालवण्यासाठी आणि नाव कमविण्यासाठी नसतात .तर जनतेच्या भल्यासाठी असतात .

त्यांनी मूकनायक साप्ताहिक 1920 मध्ये सुरू केले.राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने इंग्लंडला आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अमेरिकेला उच्च शिक्षण घेतले. येथे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की कोणीही स्वतःहून आपल्या मदतीला येत नाही. आपण आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये पात्रता निर्माण करून आपल्या ज्ञानलालसेने मदत खेचून आणली पाहिजे .

आपल्या चांगुलपणाने, आपल्या नम्र वागण्याने आणि आपल्या मधुर वाणीने खूप मोठ्या व्यक्ती सुद्धा आपल्या जवळ येऊन आपल्याला मदत करू शकतात.हेच बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातून आणि जीवनपटातुन दिसून येते.विद्यार्थ्यांनी अखंड संघर्ष केला पाहिजे .हे सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनातून घेण्यासारखे तत्त्व आहे.बाबासाहेबांनी अखंड संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मूलमंत्र होता .यातील “शिका” या शब्दातूनच “विद्यार्थी व्हा” असा अर्थ ध्वनित होतो .

Babasaheb Ambedkar – कार्य

1930 मध्ये त्यांनी जनता वृत्तपत्र सुरू केले .1956 मध्ये त्याचे नामांतर प्रबुद्ध भारत असे झाले .बाबासाहेब केवळ लेखकच नव्हते.केवळ निष्णात वकीलच नव्हते.केवळ उत्कृष्ट वक्ते नव्हते .तर ते पत्रकार सुद्धा होते .आजच्या विद्यार्थ्याने बाबासाहेबांची पूजा याच साठी केली पाहिजे की चौफेर व्यक्तिमत्त्व कसे असावे याचे बाबासाहेब म्हणजे संपूर्ण जगासमोरील जिवंत उदाहरण आहे.

एका बाजूने आदर्श विद्यार्थी, दुसऱ्या बाजूने उत्कृष्ट शिक्षक, तिसऱ्या बाजूने उत्कृष्ट वकील तर चौथ्या बाजूने लेखक आणि पत्रकार असा त्यांचा प्रवास समाज सेवेकडे झुकत चालला होता.शिक्षणाचा अंतिम अर्थ समाजसेवा, अंतिम ध्येय समाजप्रवण दृष्टिकोण हेच आहे.विद्यार्थ्यांनी स्वार्थी दृष्टिकोनातून शिक्षण घेतले तर उत्कृष्ट गुण तर मिळणारच नाहीत शिवाय खरे ज्ञानही मिळणार नाही आणि अंतिमतः निराशाच पदरी पडते.

परंतु बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा संपूर्ण उपयोग समाजासाठी करून ज्ञान आणि शिक्षण यांचे खरे कार्य काय आहे, हे जगासमोर दाखवून दिले हे विद्यार्थ्यांनी ध्यानी घ्यायची गरज आहे .2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतके दिवस रात्रंदिवस राबून त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली .हे प्रचंड आणि महान कार्य होते.1949 मध्ये ही घटना स्वीकारली तर 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अमलात आली.त्याअगोदर मजूर पक्षाची स्थापना ,मूकनायक वृत्तपत्र सुरू करणे असो की जनता वृत्तपत्र सुरू करणे असो; अशा सर्व टप्प्यांवर बाबासाहेबांनी अखंड संघर्ष केला. कौटुंबिक पातळीवर असो की सामाजिक पातळीवर असो अथवा राजकीय पातळीवर असो सर्व बाजूंनी त्यांचा संघर्ष टोकदार होत गेला .

कधीही त्यांना भौतिक सुखाचा निवांतपणा मिळाला नाही आणि त्यांनी तो मिळत असून सुद्धा स्वीकारला नाही.विद्यार्थ्यांनी हेच लक्षात घेतले पाहिजे.शिक्षण घेऊन मला काय मिळेल असा संकुचित दृष्टिकोन ठेवणारे बाबासाहेब नव्हते ;हे आजच्या विद्यार्थ्यांनी प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे.कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा अशा महान व्यक्तींशी बाबासाहेबांचा संपर्क होता.त्यांच्यावर बाबासाहेबांचे आणि बाबासाहेबांवर अशा महान व्यक्तींचे प्रचंड प्रेम होते .

एका प्रचंड गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा महान संतांच्या प्रेमाला पात्र होतो; याचा अर्थ हा शिक्षणाचा खूप मोठा विजय आहे.हे आत्ताच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.बाबासाहेबांनी भरपूर पुस्तके लिहिली .खूप संस्था काढल्या .खूप पदव्या मिळवल्या.हा भाग तर महत्त्वाचा आहेच.परंतु ;हे सर्व करण्यामागील त्यांची तत्त्वे आणि प्रेरणा काय होती ,हे मात्र विद्यार्थ्यांनी खास करून लक्षात घेतले पाहिजे.महात्मा गांधी यांच्याबरोबरचा पुणे करार असो की हिंदू कोड बिल असो अशा खूप मोठ्या प्रसंगातून बाबासाहेब घडत गेले.त्यांनी संघर्ष केला.

मनुस्मृतीचे दहन असो की महाडचे चवदार तळ्याचे आंदोलन असो अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचा, बुद्धीचा ,ज्ञानाचा कस लागला .तिथे त्यांचे ज्ञान आणि शिक्षण उजळून निघाले .व्यक्तिमत्त्व जागतिक झाले .त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वैश्विक परिमाण लाभले.हे सर्व लक्षात घेता आजच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांकडून प्रचंड अभ्यास, ध्येयाची आसक्ती, सहनशीलता, समर्पणशीलता, पराकोटीची नम्रता या गुणांबरोबरच समाजाविषयी प्रेम आणि वंचित, पीडित आणि शोषित बांधवांच्या उद्धाराची प्रचंड तळमळ हे गुण आत्मसात केले पाहिजेत.हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल.

  • यशेंद्र क्षीरसागर – ( Babasaheb Ambedkar)

कवी, लेखक, चित्रपट समीक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शैक्षणिक कार्यकर्ता. एम ए मराठी, मराठीतून नेट-सेट, पत्रकारिता विषयातून सेट, मास्टर ऑफ जर्नालिझम, b.ed, सलग 25 तास अध्यापन करण्याचा विश्वविक्रम, भारतातील सर्वात मोठी कविता 3068 ओळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, दोन कवितासंग्रह, मनातली वादळे, भारतीय संस्कृती, कविता, निबंध आणि लेख यांचे लेखन, मार्गदर्शन, प्रबोधन अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन.

Home BlogSearch Google

Leave a Reply

Close Menu